महापालिकेतील सत्तासंघर्ष टोकाला
तावडे विरुद्ध पेडणेकर सामना रंगणार
मुंबई, ता. १७ : महापालिकेतील सत्तासंघर्षाने आता टोक गाठले आहे. महापालिकेची सत्ता हाती येताच, भाजपने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. नवनियुक्त महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारताच कामाचा धडाका लावत आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे, भाजपचा हा वार परतवून लावण्यासाठी ठाकरेंनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या रूपात आपली अनुभवी फळी रणांगणात उतरवली आहे. यामुळे आगामी काळात महापालिकेत ‘हायव्होल्टेज’ राजकीय नाट्य पाहायला मिळणार आहे.
महापौर रितू तावडे यांनी पहिल्याच दिवसापासून आपला इरादा स्पष्ट केला आहे. मुंबईचे फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी त्यांनी फेरीवाल्यांविरोधात थेट रस्त्यावर उतरून मोहीम उघडली आहे. केवळ आदेश न देता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय रुग्णालयांची दुरवस्था आणि शाळांमधील खालावलेला शैक्षणिक दर्जा यावर थेट प्रहार करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.
भाजपने केवळ कामाचा धडाकाच लावला नाही, तर गेल्या अनेक वर्षांतील निविदा प्रक्रिया आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढण्यास सुरुवात केली आहे. शालेय वस्तू खरेदीतील संशयास्पद व्यवहारांचा आरोप करत, ही खरेदी केंद्र सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवरून करण्याची मागणी लावून धरली आहे. निविदांमधील पारदर्शकता, पाणीप्रश्न आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावरून महापौरांनी थेट ठाकरे गटाच्या जुन्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. भाजपची ही रणनीती उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी करण्यासाठीच असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
किशोरी पेडणेकरांच्या हाती धुरा
भाजपचा हा चौफेर हल्ला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीही आपली अनुभवी फळी मैदानात उतरवली आहे. भाजपच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लावण्यात आली आहे. पेडणेकर यांची आक्रमक शैली आणि वक्तृत्व भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी सक्षम मानले जाते. त्यांच्या सोबतीला श्रद्धा जाधव आणि विशाखा राऊत यांसारख्या मुरलेल्या नेत्यांची फौज उभी करून ठाकरेंनी महापालिकेत ‘अनुभव विरुद्ध आक्रमकता’ असा सामना उभा केला आहे.
सभागृहात ठिणगी पडणार
मुंबईच्या विस्कळित व्यवस्थेला गेल्या २५ वर्षांची सत्ता जबाबदार असल्याचे चित्र रंगवण्यात भाजप यशस्वी होताना दिसत आहे, तर दुसरीकडे ही कारवाई सूडबुद्धीने आणि श्रेयाचे राजकारण करण्यासाठी होत असल्याचा आरोप ठाकरे गट करत आहे. रितू तावडे यांचा ‘धडाका’ आणि किशोरी पेडणेकर यांची ‘अनुभवी ढाल’ यामुळे महापालिकेच्या आगामी सभा वादळी ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबईकरांनी विश्वासाने भाजपच्या हाती सत्ता दिली आहे. गेल्या २५ वर्षांत झालेली दुरवस्था आणि भ्रष्टाचार साफ करण्याची हीच वेळ आहे. आम्ही पारदर्शकतेलाच महत्त्व देऊ. यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत असले, तरी आमचा अजेंडा फक्त मुंबईचा विकास हाच आहे.
- रितू तावडे, महापौर
सत्ता आली म्हणून भाजपने सूडबुद्धीने राजकारण करू नये. केवळ उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी आरोपांच्या फेरी झाडल्या जात आहेत. आम्ही कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. शिवसेनेची ही ‘ढाल’ मुंबईकरांच्या हक्कासाठी सदैव तत्पर असेल.
- किशोरी पेडणेकर, विरोधी पक्षनेत्या
महापालिकेचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो कंत्राटदारांच्या खिशात न जाता मुंबईकरांच्या हितासाठी खर्च झाला पाहिजे. यापुढे कोणताही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही.
-अमित साटम, आमदार, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.