बनावट कागदपत्रांआधारे २०० कोटींचा अपहार
महावितरणच्या अधिकाऱ्यासह खासगी कंपन्यांविरोधात पाच गुन्हे
मुंबई, ता. २१ ः बनावट बँक गॅरंटी आणि कागदपत्रांआधारे विविध कंपन्यांना कंत्राटे मिळवून देणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांत एकूण पाच गुन्हे निर्मलनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या पाचही प्रकरणांमध्ये सुमारे २०० कोटींचा अपहार झाल्याचा आरोप आहे.
अपहाराच्या या गुन्ह्यामध्ये महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांसह कंत्राट मिळवणाऱ्या कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून बनावट कागदपत्रे तयार करणे, त्या आधारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणे आदी कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. यातील पहिला गुन्हा गेल्या महिन्यात दाखल झाला. त्याच्या तपासात अन्य चार प्रकरणे पुढे आली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. संबंधित कंपन्यांनी केलेली बँक गॅरंटी बनावट आहे, हे याची कल्पना असूनही या अधिकाऱ्याने त्याआधारे मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेअंतर्गत प्रकल्पासाठी वीज खरेदी करार (पीपीए) केला. त्यामुळे महावितरणला सुमारे २०० कोटींहून अधिक रकमेचा तोटा झाला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. या आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडून संबंधित अधिकारी आणि खासगी कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हे नोंदवून तपास सुरू केला जात आहे. या अधिकाऱ्यास कंपन्यांनी किती लाच दिली, त्याचा विनियोग कसा केला गेला हेही तपासले जात असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.