रो-रो ईली, पन तिकीटदरांनी घातलो खो!
महागड्या तिकिटांमुळे मुंबई-विजयदुर्ग फेरीवर प्रश्नचिन्ह; बस-रेल्वे स्वस्त; दर कमी करण्याची प्रवाशांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गदरम्यान १ मार्चपासून सुरू होणारी रो-पॅक्स फेरी सेवा तिकीटदरांमुळे सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर जाणारे तिकीटदर जाहीर झाल्याने ही सेवा नेमकी कोणासाठी, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. दर कमी करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या सेवेची घोषणा केली असून, १ मार्चला सकाळी ८ वाजता मुंबईतील फेरी व्हार्फ येथून या सेवेचे उद्घाटन होणार आहे. मुंबई आणि कोकणदरम्यान सागरी मार्गाने जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल, असा दावा केला जात असला तरी जाहीर केलेले तिकीटदर पाहता सर्वसामान्य प्रवाशांना ही सेवा प्रत्यक्षात कितपत परवडेल, याबाबत शंका व्यक्त होत आहे.
फेरीसाठी प्रतिप्रवासी तीन हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत तिकीटदर निश्चित करण्यात आले आहेत. त्याच्या तुलनेत रेल्वे आणि बसचा प्रवास लक्षणीयरीत्या स्वस्त आहे. सीएसएमटी ते मडगांव या मार्गावर चेअर कारचे भाडे सुमारे १,२७७ रुपये आहे, तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी २,७४२ रुपये आणि व्हिस्टाडोमसाठी सुमारे २,८२७ रुपये मोजावे लागतात.
दादरहून सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या एसी स्लीपर बसचे भाडेही साधारण दोन हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे फेरीचा पर्याय सर्वसामान्य प्रवाशांसाठी तुलनेने महागडा ठरत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
वाहनासह खर्च वाढतो
विशेषतः वाहनासह प्रवास करणाऱ्यांसाठी खर्च अधिक वाढतो. लहान कार आणि चार प्रवासी असा एकत्र प्रवास केल्यास एकूण खर्च सुमारे १८ हजार रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बोटीऐवजी रस्त्याने जाणेच अधिक परवडणारे ठरत असल्याचे अनेक प्रवासी सांगत आहेत.
सामान्य प्रवाशांचा अपेक्षाभंग
दरवर्षी गणपती, शिमगा आणि इतर सणांच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर रो-रो सेवेमुळे प्रवास अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र जाहीर झालेले तिकीटदर पाहता सर्वसामान्य कोकणवासीयांचा अपेक्षाभंग झाल्याची भावना व्यक्त होत आहे. शासनाने ही सेवा खऱ्या अर्थाने लोकप्रिय करायची असेल, तर तिकीटदर कमी करणे आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मुंबई ते सिंधुदुर्ग रो-पॅक्स सेवा सुरू होणार ही आनंदाची बाब आहे; मात्र जाहीर झालेले दर पाहता सर्वसामान्य कोकणी माणसाचा अपेक्षाभंग झाला आहे. लहान कार आणि चार प्रवाशांसाठी सुमारे १८ हजार रुपयांचा खर्च येत असेल, तर या सेवेचा किती जण वापर करतील, हा प्रश्न आहे. यापेक्षा मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करणे अधिक महत्त्वाचे आहे.
- अक्षय महापदी,
सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती
मुंबई-कोकण रो-रो सेवा सुरू होत आहे, हे निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र जाहीर केलेले तिकीटदर पाहता ही सेवा सर्वसामान्य कोकणवासीयांच्या आवाक्याबाहेरची वाटते. कोकणातील लोक वर्षानुवर्षे या सेवेची वाट पाहात होते. परंतु दर एवढे जास्त असतील तर सामान्य माणूस या सेवेकडे वळणार कसा? शासनाने तातडीने तिकीटदरांचा पुनर्विचार करून ते सर्वसामान्यांना परवडतील, असे ठेवावेत अन्यथा ही सेवा काही मोजक्या लोकांपुरतीच मर्यादित राहील.
- जयवंत दरेकर,
अध्यक्ष, कोकण विकास समिती
तिकीटदर (प्रवासी)
इकॉनॉमी : ३ हजार रु.
प्रीमियम इकॉनॉमी : ५ हजार रु.
बिझनेस : ७ हजार रु.
फर्स्ट क्लास : ९ हजार रु.
रेल्वे तिकीटदर -
सीएसएमटी ते मडगाव
चेअर कार - १,२७७
एक्झिक्युटिव्ह चेअर कार - २,७४२
व्हिस्टाडोम - २,८२७
बस तिकीटदर -
दादर ते सिंधुदुर्ग -
एसी स्लीपर - २,००० सुमारे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.