अपूर्ण विकासकामांचा धोका!
पर्यावरणतज्ज्ञांचा इशारा; सखल भागांत पाणी अडण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने सिमेंट काँक्रीटीकरणाचा धडाका लावला असला, तरी अर्धवट राहिलेली कामे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांसाठी ‘विघ्न’ ठरण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरात सुरू असलेली उड्डाणपुलांची कामे आणि रस्त्यांचे खोदकाम ३१ मेपर्यंत पूर्ण करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. जी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्य नाही, ती सुरक्षित टप्प्यावर थांबवून नागरिकांना कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री करणे, ही आता पालिकेची मुख्य ‘अग्निपरीक्षा’ ठरणार आहे.
दादरचा टिळक पूल, भायखळ्याचा वाय पूल आणि अंधेरीचा गोखले पूल यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र, ही कामे पावसाळ्यापूर्वी १०० टक्के पूर्ण होणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. अशा परिस्थितीत अर्धवट राहिलेल्या कामांमुळे रस्ते अरुंद होणे, बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडून राहणे आणि खोदलेल्या खड्ड्यांत पाणी साचून अपघात होणे, असे धोके निर्माण होऊ शकतात. विशेषतः भायखळा आणि दादर यांसारख्या सखल भागांत पुलांच्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेड्समुळे पाण्याचा प्रवाह अडकण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नुकताच कामांचा आढावा घेतला. काँक्रीटीकरणाच्या टप्पा १ आणि २ अंतर्गत आतापर्यंत ६३ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, पावसाळ्यापूर्वी उर्वरित ९० दिवसांत रस्तेनिहाय सूक्ष्म नियोजन करावे. खोदलेले रस्ते निश्चित कालमर्यादेतच पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. पावसाळ्यात नागरिकांना कमीत कमी असुविधा होईल, अशा पद्धतीने कामांची अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
राडारोडा तातडीने हटवण्याचे पालिकेचे निर्देश
अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनीदेखील स्पष्ट केले आहे की, पावसाळ्यापूर्वी हातामध्ये असलेल्या ९० दिवसांचा उपयोग गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी केला जाईल. तथापि, जी कामे पूर्ण होणार नाहीत, तिथे कंत्राटदारांनी पुरेसा प्रकाश, सुरक्षा रक्षक आणि पाणी उपसण्यासाठी पंप तैनात ठेवणे अनिवार्य आहे. राडारोडा तातडीने हटवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून तो वाहून नाल्यात जाणार नाही आणि पाणी तुंबण्याच्या समस्या उद्भवणार नाहीत.
जागोजागी खोदकाम
शहरातील ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी हे रस्ते सपाट करून खडीमुक्त करणे आवश्यक आहे. जर खोदलेले रस्ते अर्धवट राहिले, तर पावसाच्या पाण्यात रस्ता आणि खड्डा यातील अंतर ओळखणे कठीण होईल, ज्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो.
विकासकामे होणे गरजेचे आहे, पण पावसाळ्यात ती मुंबईकरांच्या जीवावर बेतू नयेत. अपूर्ण कामांमुळे वाहतूक कोंडी किंवा पाणी तुंबणार नाही, याची तांत्रिक खातरजमा पालिकेने आताच करायला हवी.
- ॲड. गॉडफ्रे पिमेंटा, सामाजिक कार्यकर्ते
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.