डिजिटल शिक्षणावर भर!
पालिकेचा ४,२४८ कोटींचा शैक्षणिक अर्थसंकल्प; विद्यार्थ्यांसाठी नवे उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई महापालिकेचा तब्बल ८०,९५२.५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी (ता. २५) सादर करण्यात आला. महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचा चार हजार २४८ काेटी आठ लाख रुपयांचा अर्थसंकल्प शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्याकडे सादर केला.
यंदाच्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि कलात्मक विकासासाठी ‘मिशन सफल'' ही नवीन संकल्पना मांडण्यात आली असून, पालिका शाळांमध्ये प्रथमच एनसीसी (राष्ट्रीय छात्रसेना) सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांसाठी ४९० कोटींची तरतूद
शिक्षण विभागाने शालेय इमारतींच्या पुनर्बांधणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मार्च २०२६पर्यंत ५७ शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि नवीन बांधकामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी भांडवली अर्थसंकल्पात ४९० कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्यापैकी ३४० कोटी रुपये थेट शालेय इमारतींच्या बांधकामांसाठी खर्च केले जातील. तसेच शाळांमधील ग्रंथालयांच्या कायापालटासाठी पाच कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी राखीव ठेवला आहे.
काय आहे ‘मिशन सफल’?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी)अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मिशन सफल’ राबविले जाणार आहे. याअंतर्गत शारीरिक शिक्षण (एनसीसी)वर भर दिला जाणार आहे. इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी एनसीसी पथके स्थापन केली जातील. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी तीन कला उत्कृष्टता केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच शालेय स्तरावर संगीत साहित्य खरेदीसाठी एक कोटींची तरतूद असून, १५० शाळांमध्ये विशेष कलावर्ग सुरू होतील.
तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण
आधुनिक शिक्षणाची सांगड घालताना पालिकेने तंत्रज्ञानावर मोठा खर्च प्रस्तावित केला आहे. डिजिटल क्लासरूमवर भर देण्यात आला असून, ७,९५३ वर्गखोल्यांमध्ये एलईडी इंटरॲक्टिव्ह पॅनेल बसवण्यासाठी १२३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. खगोलशास्त्र प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात येत असून, ५५ शाळांनंतर आता आणखी ४० शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत. या अर्थसंकल्पात सायबर साक्षरतेवरही भर देण्यात आला आहे. २०,००० विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षिततेचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाईल.
विद्यार्थी कल्याणकारी योजना
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बसचा मोफत प्रवास सुरूच राहणार असून, त्यासाठी १६ कोटींची तरतूद आहे. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदापासून विशेष शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाईल.
गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
पालिकेच्या सीबीएसई/आयसीएसई शाळांमधून दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या २५ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा केवळ मोजक्या लोकांचा विशेषाधिकार नसून, मुंबईतील प्रत्येक बालकाचा तो अधिकार आहे. शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे आयुक्त भूषण गगराणी यांनी अर्थसंकल्पी निवेदनात म्हटले आहे.
प्राथमिक शिक्षणासाठी निधी : ४,२४८ कोटी आठ लाख रुपये
शालेय पायाभूत सुविधा :
- ५७ शाळांची इमारती दुरुस्ती/नूतनीकरण
- ४९० कोटींची तरतूद (३४० कोटी थेट बांधकामासाठी)
- ५ कोटी ग्रंथालय सुधारणा
‘मिशन सफल’अंतर्गत उपक्रम :
- एनसीसी पथके इयत्ता आठवी-नववी विद्यार्थ्यांसाठी
- तीन कला उत्कृष्टता केंद्रे
- १५० शाळांमध्ये कलावर्ग आणि संगीत साहित्यासाठी एक कोटींची तरतूद
तंत्रज्ञान आधारित शिक्षण :
- ७,९५३ वर्गखोल्यांमध्ये डिजिटल/एलईडी इंटरॲक्टिव्ह पॅनेल - १२३ कोटी
- ४० नवीन खगोलशास्त्र प्रयोगशाळा
- २०,००० विद्यार्थ्यांना सायबर साक्षरतेचे प्रशिक्षण
विद्यार्थी कल्याण :
- मोफत बेस्ट बससेवा - १६ कोटी
- इयत्ता नववीसाठी विशेष शैक्षणिक सहली
उच्च गुणांसाठी आर्थिक सहाय्य :
सीबीएसई/आयसीएसई दहावीत ९० %पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना २५,००० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.