कामा रुग्णालयात भ्रूण प्रत्यारोपण
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील ऐतिहासिक कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्य सरकारच्या कामा रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत एक ऐतिहासिक कामगिरी पार पडली आहे. प्राथमिक वंध्यत्व आणि गंभीर द्विपक्षीय ट्यूबल ब्लॉकेज असलेल्या ३३ वर्षीय महिलेमध्ये पहिले यशस्वी भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले. शासकीय रुग्णालयात प्रगत प्रजनन उपचार यशस्वीपणे राबविण्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
नालासोपारा (पूर्व) येथील या महिलेला अनेक वर्षे अपत्यप्राप्ती होत नव्हती. तपासणीत दोन्ही फलोपियन ट्यूब पूर्णपणे बंद असल्याचे आढळले. तिच्या ४४ वर्षीय पतीचे वीर्यपरीक्षण सामान्य होते. पूर्वीच्या लॅप्रोस्कोपीत संपूर्ण ट्यूबल ब्लॉकेज स्पष्ट झाले होते. त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा शक्य नव्हती. वैद्यकीय तपासणीत सर्व वैद्यकीय चाचण्या सामान्य होत्या आणि अँट्रल फॉलिकल काउंट समाधानकारक होता. अंडाशयाची क्षमता चांगली असली तरी ट्यूब निकामी असल्याने आयव्हीएफ हाच एकमेव पर्याय होता. विविध प्रक्रियांनंतर २१ फेब्रुवारी रोजी भ्रूण प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण झाले. ही कामगिरी शासकीय रुग्णालयासाठी मैलाचा दगड ठरली आहे. आयव्हीएफसारखे उपचार सहसा महागड्या खासगी रुग्णालयांत उपलब्ध असतात; मात्र आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही परवडणारे आणि शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित साहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे समन्वित टीमवर्क, आधुनिक भ्रूणविज्ञान प्रयोगशाळा आणि सर्वांसाठी समान आरोग्यसेवेची बांधिलकी यामुळे हे यश शक्य झाले. ही केवळ वैद्यकीय यशोगाथा नसून असंख्य वंध्यत्वग्रस्त दाम्पत्यांसाठी आशेचा नवा किरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.