दादरमधील शिधावाटप कार्यालयाची दैनावस्था! तुटलेली दारे आणि गळके छत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईचे मध्यवर्ती केंद्र समजल्या जाणाऱ्या दादरमधील शिंदेवाडी येथील शिधावाटप (रेशनिंग) कार्यालयाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. मोडकळीस आलेली इमारत, भेगाळलेल्या भिंती आणि घाणीच्या साम्राज्यात कर्मचारी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. शिवडी विधानसभा भाजप वॉर्ड अध्यक्ष साक्षी दरेकर यांनी या कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला आहे.
शिंदेवाडी येथील हे कार्यालय महापालिकेच्या एका जुन्या इमारतीत भाडेतत्त्वावर चालवले जाते. मात्र, सध्या या कार्यालयाचे स्वरूप एखाद्या भकास वास्तूसारखे झाले आहे. भिंतींना मोठ्या भेगा गेल्या असून, सिमेंटचे कोपरे निखळत आहेत. छताचा पीओपी खिळखिळा झाला असून, तो कधीही कोसळण्याची भीती आहे. कार्यालयातील टेबलं मोडलेली असून, खुर्च्या तुटलेल्या आहेत. याच परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचारी तासनतास काम करत असतात. कार्यालयातील खिडक्या आणि दारे तुटलेली असून, पावसाळ्यात पाणी आत येण्याची दाट शक्यता आहे.
या कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे, मात्र त्यांच्यासाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट आहे. जागोजागी साचलेले पाणी, घाणीचे साम्राज्य आणि पसरलेली दुर्गंधी यामुळे महिलांना कार्यालयाबाहेरील खासगी शौचालयांचा आधार घ्यावा लागत आहे. ‘दादरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सरकारी कार्यालयाची अशी अवस्था असणे ही सरकारसाठी नामुष्कीची बाब आहे’ असे मत येथे येणारे नागरिक व्यक्त करत आहेत. एकीकडे सरकार डिजिटल इंडिया आणि हायटेक कार्यालयांच्या गप्पा मारत असताना, मुंबईच्या हृदयस्थानी असलेल्या रेशनिंग कार्यालयाला साधी दुरुस्तीही मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. आता नागरिकांच्या संतापानंतर प्रशासनाला जाग येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
........
आम्ही कार्यालयाच्या दुरवस्थेबाबत वरिष्ठांना अनेकदा लेखी कळवले आहे. मात्र, ‘कार्यालयाची दुरुस्ती स्वखर्चाने करा’ असे उत्तर वरून वारंवार दिले जात आहे. अशा परिस्थितीत काम करणे कठीण झाले आहे.
- गणेश पवार, शिधावाटप अधिकारी
........
सामान्य नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. महत्त्वाच्या सरकारी कार्यालयाची ही अवस्था चिंतेची बाब आहे. सरकारने तातडीने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी अन्यथा भाजपच्या माध्यमातून तीव्र निदर्शने केली जातील.
- साक्षी दरेकर, वार्ड अध्यक्ष, भाजप, शिवडी विधानसभा