रंग खेळा, पण डोळ्यांची सुरक्षा विसरू नका!
नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे नेत्रतज्ज्ञांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : वसंत ऋतूच्या आगमनासोबत येणारा होळीचा सण आनंद, उत्साह आणि रंगांची उधळण घेऊन येतो. मात्र, रंगांचा हा उत्सव साजरा करताना डोळ्यांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे.
होळी खेळताना वापरले जाणारे कृत्रिम रंग डोळ्यांसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे शक्यतो सेंद्रिय किंवा हर्बल रंगांचा वापर करावा, असा सल्ला चेंबूरच्या डॉ. अगरवाल्स नेत्र रुग्णालयातील डॉ. मीनल कान्हेरे यांनी दिला आहे. रासायनिक रंगांमुळे डोळ्यांची जळजळ, ॲलर्जी किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो, असे त्यांनी सांगितले.
होळी खेळताना संरक्षणात्मक गॉगल्सचा वापर करावा. तसेच डोळ्यांभोवती खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावल्यास अतिरिक्त संरक्षण मिळू शकते. रंग खेळताना कॉन्टॅक्ट लेन्स अजिबात वापरू नयेत. त्यामुळे कॉर्नियल इन्फेक्शन होऊन गंभीर परिणाम संभवतात, असा इशाराही त्यांनी दिला.
मुलांनी प्रौढांच्या देखरेखीखालीच रंग खेळावेत. पाण्याचे फुगे थेट चेहऱ्यावर किंवा डोळ्यांवर फेकणे टाळावे, कारण दाबामुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होऊ शकते. होळीच्या आगीजवळ जाताना सावधगिरी बाळगणेही गरजेचे आहे. उष्णतेमुळे डोळ्यांना भाजण्याचा धोका असतो. होळी खेळताना पाण्याचे फुगे सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक फेकावेत. पाण्याचे फुगे थेट चेहऱ्यावर किंवा डोळ्यांवर फेकू नका कारण दाबामुळे डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते. चुकून डोळ्यात रंग गेल्यास त्वरित स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत आणि नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. धूळ, धूर किंवा कोरड्या रंगांमुळे कोरडेपणा जाणवल्यास कृत्रिम अश्रू (लुब्रिकेटिंग आयड्रॉप्स) वापरावेत, असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे.
नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने काय म्हणतात?
-हर्बल किंवा सेंद्रिय रंग वापरा
- कुणीही जबरदस्तीने डोळ्यांमध्ये रंग टाकणार नाही, याची काळजी घ्या.
-हाताला रंग लागले असल्यास डोळे चोळू नका. होळी खेळण्यापूर्वी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावा.
- डोळ्यांत रंग गेल्यास लगेच स्वच्छ पाण्याने धुवा, साबण किंवा इतर कोणतेही रासायनिक द्रव्य डोळ्यात टाकू नका.
- डोळ्यांत त्रास वाटल्यास जळजळ, धूसर दृष्टी किंवा वेदना असल्यास नेत्रविकार तज्ज्ञांकडे जा.
- जळजळ, लालसरपणा आणि खाज सुटू शकते.
-रंगाच्या कणांमुळे डोळ्यांच्या पटलावर ओरखडे येतात, त्यामुळे दृष्टीला धोका होऊ शकतो.
अशा प्रकारे घ्या काळजी
* बर्फाचे तुकडे ः होळी खेळण्याआधी बर्फाचे तुकडे त्वचेवर फिरवणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने त्वचेवरील छिद्र बंद होऊन त्वचेत रंग प्रवेशाची शक्यतादेखील कमी होते. त्यामुळे मुरुमांना प्रतिबंध करता येणे शक्य होईल. बर्फाचे तुकडे किमान १५ मिनिटे चेहऱ्यावर चोळू शकता.
* सूर्यप्रकाश प्रतिबंधक क्रीम वापरा : होळी ही घराबाहेर खेळली जाते. एखादी व्यक्ती सतत सूर्याच्या संपर्कात असते. रंग आणि पाणी तुमच्या त्वचेतील ओलावा कमी करू शकते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि काळवंडते. योग्य सनस्क्रीन निवडण्यापूर्वी तज्ज्ञांची मदत घ्या.
* शरीराला न चुकता तेल लावा : तुम्ही तुमच्या केसांनाच नव्हे तर शरीरालाही तेल लावावे. कारण तेल लावल्याने रंग सहज काढण्यास मदत होते. तेल त्वचेचा नैसर्गिक पोत सुधारण्यास आणि ॲलर्जी, मुरुमांपासून दूर ठेवण्यास मदत करेल. यासाठी नारळ किंवा बदाम यासारखे कोणतेही तेल निवडू शकता.
* चांगल्या दर्जाची ओठसंरक्षक क्रीम वापरा : त्वचेचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे ओठ. होळी खेळण्यापूर्वी ओठ हे संरक्षक क्रीमच्या थराने झाकून घ्या. अशा क्रीम तुमच्या ओठांना ओलावा देतात आणि हानिकारक रंगांपासून तुमच्या ओठांच्या भेगा पडण्यापासून रोखतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.