एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात
१४-१५ वयोगटातील मुलींना कर्करोगापासून संरक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा मुंबईसह राज्यात आज उत्साहात प्रारंभ झाला. मुंबईतील नायर रुग्णालयात राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि महापौर रितू तावडे यांच्या हस्ते पाच विद्यार्थिनींना लस देऊन मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर येथून या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमात मुंबईतील मान्यवर दृकश्राव्य माध्यमाद्वारे सहभागी झाले होते. मुंबईत पहिल्या टप्प्यात महापालिका शाळांमधील २४ हजार ९३६ मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे.
महानगरात १४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षांखालील अंदाजे एक लाख ३० हजार मुली या मोहिमेसाठी पात्र आहेत. महापालिका शाळांनंतर खासगी व अनुदानित शाळांतील मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रियेची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र सरकारच्या ‘यू-विन’ संकेतस्थळाद्वारे डिजिटल पद्धतीने होणार असून, पुढील आठवड्यापासून पालकांना नोंदणी करता येईल.
‘‘गर्भाशय मुखाचा कर्करोग हा लसीकरणाद्वारे टाळता येऊ शकणारा कर्करोग आहे. पालकांनी आपल्या मुलींच्या आरोग्यासाठी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा,’’ असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले. लसीकरण ऐच्छिक असून, पालकांची लेखी संमती आवश्यक राहील.
या वेळी उपमहापौर संजय घाडी, आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
तीन महिने मोहीम
ही मोहीम पुढील तीन महिने सुरू राहणार आहे. शहरातील २३६ आरोग्य केंद्रे, २७ प्रसूतिगृहे, १६ सर्वसाधारण रुग्णालये आणि पाच वैद्यकीय महाविद्यालये अशा एकूण २८४ केंद्रांवर लस मोफत उपलब्ध असेल. ‘गार्डसिल-४’ ही लस सुरक्षित मानली जाते. लसीकरणानंतर सौम्य ताप, सूज किंवा वेदना जाणवल्यास तत्काळ उपचारासाठी प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.