कोस्टल रोडचे पुढील टप्पेही मार्गी लागणार
नव्या अर्थसंकल्पात १,९५० कोटींची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण)’ प्रकल्पाचा विस्तार आणि पुढील टप्पे पूर्ण करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आगामी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात १,९५० कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना मोठी गती मिळणार आहे.
किनारी रस्त्याचा मोठा भाग वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी, प्रकल्पाची पूर्ण व्याप्ती गाठण्यासाठी पालिकेने कालबद्ध नियोजन केले आहे. हाजी अली येथील अद्ययावत वाहनतळ आणि सुमारे २.२५ कि.मी. लांबीच्या उर्वरित विहारपथाचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून प्रियदर्शनी पार्क ते हाजी अली आणि बडोदा पॅलेस ते वरळी या ५.२५ कि.मी. पट्ट्यातील वॉक-वे आणि सायकल ट्रॅक नागरिकांसाठी आधीच खुला करण्यात आला आहे. आर्थिक तरतुदीचा तपशील प्रकल्पाचा दर्जा आणि वेग टिकवून ठेवण्यासाठी पालिकेने आर्थिक नियोजन केले आहे. २०२५-२६ (सुधारित अंदाज): १,०००.६९ कोटी तर २०२६-२७ (प्रस्तावित) १,९५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या भरीव निधीमुळे तांत्रिक कामे, सौंदर्यीकरण आणि सुव्यवस्थित वाहतूक मार्गिकांची कामे विनाअडथळा पूर्ण होतील.
प्रकल्पांतर्गत मिळवलेल्या ५३ हेक्टर जमिनीवर जागतिक दर्जाचे सार्वजनिक उद्यान विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आंतरराष्ट्रीय लँडस्केप आर्किटेक्टच्या मदतीने हे क्षेत्र मुंबईचे ‘हरित फुप्फुस’ म्हणून ओळखले जाईल. या उद्यानाची देखभाल एका स्वयंसेवी संस्थेमार्फत (एनजीओ) केली जाणार असल्याने पालिकेवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.
प्रकल्पाचे मुख्य फायदे
१. वेळेची ७० टक्के बचत : प्रिंसेस स्ट्रीट ते वरळी सेतू हा प्रवास आता अत्यंत कमी वेळात पूर्ण होत आहे.
२. इंधनाची ३० टक्के बचत : वेगवान प्रवासामुळे मुंबईकरांच्या खिशालाही दिलासा मिळत आहे.
३. देशातील पहिला ‘मेलोडी रोड’: अमरसन्स गार्डन ते महालक्ष्मी मंदिरदरम्यान ५०० मीटरचा ‘संगीत रस्ता’ विकसित करण्यात आला असून, त्याचे नुकतेच उद्घाटन झाले आहे.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.