फुलांच्या पाकळ्यांतून पर्यावरणाचा संदेश
होळीनिमित्त महापौर रितू तावडे यांचा अभिनव उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : होळी आणि धुळवड हे सण आनंदाने साजरे करतानाच पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. याच कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी महापौर रितू तावडे यांच्या पुढाकाराने आज (ता. ३) घाटकोपरमध्ये ‘फुलांची होळी’ हा अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे या उपक्रमात वापरलेल्या फुलांचा पुनर्वापर करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे.
राजावाडी उद्यान, घाटकोपर पूर्व येथे हा कार्यक्रम पार पडला. या वेळी महापौर रितू तावडे आणि आमदार पराग शाह हे उपस्थित होते. रासायनिक रंगांचा त्याग, पाण्याची बचत आणि पर्यावरण जनजागृती करणे हा यामागील प्रमुख उद्देश होता.
महापौर रितू तावडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा उपक्रम आयोजित केला होता. या वेळी त्या म्हणाल्या, की केवळ आवाहन करण्यापेक्षा स्वतः कृतीतून आदर्श निर्माण करणे महत्त्वाचे आहे. रासायनिक रंग आणि पाण्याचा अपव्यय टाळून फुलांच्या पाकळ्यांनी सण साजरा करणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. या उपक्रमात जमा झालेली सर्व फुले कचऱ्यात न टाकता त्यापासून सेंद्रिय खत बनवले जाईल. त्यामुळे स्वच्छ व हरित मुंबई संकल्पनेला बळकटी मिळेल.
या वेळी आमदार पराग शाह यांनी महापौरांच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, की सण साजरे करताना ध्वनिप्रदूषण टाळणे आणि निवासी क्षेत्रांत शांतता राखणे गरजेचे आहे. महापौरांनी फुलांच्या होळीतून दिलेला हा संदेश नागरिकांनी आपल्या आयुष्यात उतरवणे ही काळाची गरज आहे.
या उपक्रमानंतर संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली असून, संकलित केलेली फुले खतनिर्मिती प्रकल्पाकडे पाठवण्यात आली आहेत. मुंबईकरांनी अशा पर्यावरणपूरक उपक्रमांचे अनुकरण करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
नैसर्गिक रंगाचा वापर करा
होळी साजरी करताना झाडांची तोड न करता केवळ सुक्या लाकडाचा वापर करावा. प्लॅस्टिक, टायर किंवा रबर यांसारख्या प्रदूषक वस्तू जाळू नयेत. नैसर्गिक आणि सेंद्रिय रंगांचा वापर करावा, असे आवाहन महापौरांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.