भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांचा वैचारिक सोहळा
मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत १६ शोधनिबंध सादर
मुंबई, ता. ३ : मुंबई विद्यापीठअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, आंबेडकर चेअर (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे आणि डॉ. आंबेडकरांची विकासदृष्टी’ या विषयावर भव्य आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या परिसंवादात संशोधनाधारित १६ शोध निबंध सादर होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विकासदृष्टीचा सखोल वेध घेण्यात आला. उद्घाटन सत्राची सुरुवात नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते झाली. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी जे. एस. सहारिया यांनी राज्यघटनेतील मूलभूत मूल्ये आणि त्यांचे समकालीन महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. मनीषा कर्णे यांनी स्वागतपर भाषण केले, तर डॉ. कैलास गायकवाड यांनी परिसंवादामागील संशोधनपर भूमिका स्पष्ट केली. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी परिषदेस शुभेच्छा देत संविधानवादी विचारांच्या प्रसाराची गरज व्यक्त केली.
विशेष सत्रांमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, हैदराबाद आदी राज्यांतील संशोधकांनी सहभाग नोंदवला. आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही प्रतिसाद मिळाला असून, साउथॅम्प्टन विद्यापीठातील संशोधकाने आपला शोध निबंध सादर केला. तसेच थायलंड येथून डॉ. श्रीरंजन आवटे यांनी समारोप सत्रात मार्गदर्शन केले. सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, आरक्षण धोरण, लोकशाही मूल्ये, राज्यघटनात्मक शासनव्यवस्था आणि सर्वसमावेशक विकास या विषयांवर अभ्यासकांनी संशोधनपर मांडणी केली.
दुपारच्या पूर्ण अधिवेशनात दीपक करंजीकर यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दूरदर्शी अर्थतज्ज्ञ’ या विषयावर व्याख्यान देत आंबेडकरांच्या आर्थिक विचारसरणीचा परामर्श घेतला. त्यानंतर राज्यघटनात्मक शासन आणि विकासाच्या दिशांवर सखोल चर्चा रंगली. परिसंवादातील दोन सत्रांचे समन्वयक म्हणून डॉ. प्रिया वैद्य आणि डॉ. सोनाली वाखर्डे यांनी काम पाहिले.
समारोप सत्रात डॉ. श्रीरंजन आवटे यांनी भारतीय राज्यघटना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करत सामाजिक क्रांतीकडे वाटचाल करण्याची गरज अधोरेखित केली. सहभागी अभ्यासकांना प्रमाणपत्रे आणि समिती सदस्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राशी बग्गा यांनी केले, तर आभार प्रदर्शन संध्या आंबाडे आणि गंभीरे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.