रिकाम्या भूखंडावर इमारती बांधणार
मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्प : घर रिकामे करताच चावी देणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलालनगर एक, दोन व तीनचा पुनर्विकास म्हाडा खासगी विकसकाच्या मदतीने करत आहे. पहिल्या टप्प्यात येथील मैदानांसह रिकाम्या असलेल्या भूखंडावर इमारती उभारल्या जाणार आहेत. रहिवाशांना ‘की टू की’ म्हणजे त्यांची घरे रिकामी करतानाच नव्या घराची चावी देण्याचे नियोजन आहे, त्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्प हा गोरेगाव येथील मोक्याच्या ठिकाणी १४३ एकरांवर पसरलेला आहे. हा प्रकल्प मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे. म्हाडा खासगी विकसकाच्या माध्यमातून बांधकाम आणि विकास (सी अँड डी) या तत्त्वावर हा प्रकल्प राबवत आहे. पुनर्विकास योजनेनुसार वसाहतीतील मैदाने, पार्किंगची जागा, उद्याने अशा मोकळ्या जागांवर आधी बांधकाम केले जाणार आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या बांधकाम आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याला म्हाडाने मंजुरी दिल्यानंतर प्रकल्पाचे तपशील रहिवाशांपुढे मांडले जातील, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
राज्य सरकारने या पुनर्विकास प्रकल्पाला ‘विशेष प्रकल्प’ दर्जा दिला आहे. या प्रकल्पांतर्गत रहिवाशांना १,६०० चौरस फूट बांधकाम क्षेत्राची घरे देण्यात येणार असून ९८७ चौरस फूट बांधकाम क्षेत्राचे व्यावसायिक गाळे देण्यात येणार आहेत. या वसाहतीत ३,३४० निवासी घरे असून ३२८ व्यावसायिक गाळे आहेत. अदाणी प्रॉपर्टीजने म्हाडाच्या निविदेत ३६ हजार कोटींची सर्वोच्च बोली लावून हा प्रकल्प मिळवला आहे.
आरक्षण बदलणार
मोतीलालनगरमध्ये सध्या मैदाने, गार्डन, पार्क अशी वेगवेगळी आरक्षणे आहेत. सुरुवातीला रिकाम्या असलेल्या मैदानांवर, गार्डनच्या जागेवर निवासी इमारती उभारल्या जाणार आहेत. तेथे असलेले आरक्षण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टाकून लेआऊटमध्ये बदल केला जाणार आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या जागांवर रहिवाशांकरिता इमारती उभारणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.