पूरमुक्त मुंबईसाठी मोठे पाऊल!
‘एनडीएमए’कडून शहरी पूर जोखीम व्यवस्थापन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : हवामान बदलामुळे वाढणारा अतिवृष्टीचा धोका आणि समुद्राच्या वाढत्या पातळीपासून आर्थिक राजधानीचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहराचा ‘शहरी पूर जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम’ प्रभावीपणे राबवण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (एनडीएमए) आर्थिक सहाय्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला लवकरच तत्त्वतः मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ४६.६७ कोटींची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम केवळ सिमेंट-काँक्रीटच्या बांधकामावर मर्यादित नसून, तो निसर्गाधारित आणि तंत्रज्ञानावर आधारित अशा दोन मुख्य भागांत विभागलेला आहे. निसर्गाधारित आणि असंरचनात्मक उपाय यामध्ये शहरात पाणी जमिनीत मुरावे आणि पावसाचा निचरा व्हावा, यासाठी आधुनिक संकल्पना राबवल्या जाणार आहेत. स्पंज पार्क्स आणि ग्रीन कॉरिडॉरवर भर देण्यात येणार आहे. शहरात पाणी शोषून घेणारी उद्याने विकसित केली जातील.
या उपाययोजनांच्या अंतर्गत वन विभागाच्या मदतीने खारफुटी आणि आर्द्रभूमीचे रक्षण केले जाईल. पावसाचा अंदाज घेऊन नागरिकांना आधीच सतर्क करण्यासाठी आयटी आधारित यंत्रणा उभी केली जाईल. तसेच पावसाचे पाणी साठवण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचा वापर वाढवला जाईल.
भूमिगत पाण्याचे बोगदे
पाण्याचा उपसा करण्यासाठी आणि ते समुद्रात सोडण्यासाठी मोठी पायाभूत कामे केली जातील.
पीएम गार्डन ते दादर सी-फेस आणि टी. एन. वैद्यकीय महाविद्यालय ते हाजीअली दरम्यान भूमिगत पाण्याचे बोगदे बांधले जातील. माहूल आणि मोगरा येथे नवीन उदंचन केंद्रे उभारली जातील, तर हाजी अली आणि इर्ला येथील केंद्रांची क्षमता वाढवली जाईल. समुद्राचे पाणी शहरात शिरू नये म्हणून आऊटफॉलवर स्वयंचलित फ्लड गेट्स लावले जातील. पावसाचे पाणी तात्पुरते साठवण्यासाठी मोठ्या टाक्यांचे बांधकाम केले जाईल.
आपत्ती प्रतिरोधक बनवणार
‘‘आम्ही केवळ आजच्या पावसाळ्याचा विचार करत नसून, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘भविष्याभिमुख मुंबई’ घडवत आहोत. तंत्रज्ञान आणि निसर्ग यांचा मेळ घालून मुंबईला आपत्ती प्रतिरोधक बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’’ असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या उपक्रमामुळे मुंबईतील सखल भागांत साचणाऱ्या पाण्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत शहराचे कामकाज अखंडित सुरू राहण्यास मदत होईल, असा दावा ही महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
...........