सुपारीचे झाड बांधल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
विरार-चर्चगेट लोकल २० मिनिटे उशिरा; रेल्वे प्रशासनाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : होळीच्या पारंपरिक विधीसाठी लोकलच्या दरवाजाला सुपारीचे झाड बांधल्याने विरार ते चर्चगेट लोकलचे वेळापत्रक विस्कळित झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माहीम येथील मोरी रोड परिसरातील काही तरुणांनी रविवारी (ता. १) रात्री ११.४० वाजताच्या विरार-चर्चगेट लोकलमध्ये सुपारीचे झाड बांधल्याचा प्रकार घडला. झाड बांधण्यासाठी लोकल काही काळ थांबवण्यात आली होती. रात्रीची वेळ असल्याने गाडीत प्रवाशांची गर्दी कमी होती. मात्र गाडी थांबवल्याने संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम झाला. या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकल बोरिवली स्थानकाच्या पाचव्या फलाटावर आल्यानंतर तेथील स्थानक व्यवस्थापक रणजित कुमार यांनी डब्याची पाहणी केली. त्या वेळी सुपारीचे झाड लोकलच्या दरवाजाला बांधले असल्याचे दिसले. त्यामुळे प्रवाशांना चढणे-उतरणे अडथळ्याचे ठरत होते. या प्रकारामुळे गाडी सुमारे २० मिनिटे उशिराने धावल्याचेही निदर्शनास आले. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तींना डब्यातून खाली उतरवून त्यांच्यावर कारवाई केली. आकाश ढोणे (३३), सागर बने (२२), अनिलकुमार सिंग (२२), अशोक गुंजलप्पा (२७), ब्रह्मदेना हुसैन (३८) आणि शेखर कोळी (३७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
........
रेल्वेचे स्पष्टीकरण
लोकलच्या दरवाजाला आडवे सुपारीचे झाड बांधल्यामुळे प्रवाशांच्या हालचालीस अडथळा निर्माण झाला होता. अशा प्रकारामुळे प्रवाशांना दुखापत होण्याचा तसेच गंभीर अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.