शिंदेंनी कष्टाला न्याय दिला
शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार डॉ. ज्योती वाघमारे भावुक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : ‘‘राजकारणात टिकण्यासाठी मोठा वारसा किंवा मोठे आडनाव लागते, असा समज आहे. मी कोणत्याही मोठ्या बापाची मुलगी नाही, पण पक्षासाठी केलेली प्रामाणिक धडपड एकनाथ शिंदे यांच्यासारखा नेता बघत असतो. गरीब कार्यकर्त्यालाही न्याय मिळू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे माझी उमेदवारी आहे,’’ अशा शब्दांत शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवार डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिवसेनेच्या आक्रमक प्रवक्त्या डॉ. वाघमारे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, संजय शिरसाट, आमदार डॉ. मनीषा कायंदे, ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, शायना एन. सी. आदी मान्यवर उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना डॉ. वाघमारे म्हणाल्या, की ही उमेदवारी केवळ माझी नसून राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींचा हा सन्मान आहे. ‘‘माझी उमेदवारी ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची, सावित्रीबाई फुलेंच्या पाटीची आणि संविधानाने दिलेल्या अधिकाराची ताकद आहे. माझ्या आई-वडिलांना राज्यसभा काय असते, हे माहीतही नाही. पण शिंदेंनी जातीपातीच्या भिंती तोडून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बळ दिले,’’ असे सांगताना त्या भावुक झाल्या होत्या.
पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली
मूळच्या सोलापूरच्या असलेल्या डॉ. ज्योती वाघमारे यांचा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झाला आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणून काम केले. पत्र्याच्या शेडमध्ये राहून अनवाणी शाळेत जात ज्योती यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पाच भाषांवर प्रभुत्व असलेल्या डॉ. वाघमारे यांनी गेल्या १५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. एप्रिल २०२३मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आपल्या अभ्यासपूर्ण व आक्रमक शैलीने पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.
......
‘‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी नेहमीच सामान्य कार्यकर्त्याला मोठे केले. तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. डॉ. ज्योती वाघमारे यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवली. त्या राज्यसभेत सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडतील, असा मला विश्वास आहे. कर्तबगार महिलांना संधी देणे हाच लाडकी बहीण योजनेचा खरा उद्देश आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.