‘वनराज’ कधी गर्जना करणार?
राणीच्या बागेत गुजरातचे सिंह देण्याची महापौरांची विनंती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) अनेक वर्षांपासून रिकामा असलेला सिंहाचा पिंजरा आता लवकरच भरण्याची शक्यता आहे. महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांना पत्र लिहून ‘गुडविल जेस्चर’ (सदिच्छा भेट) म्हणून आशियाई सिंहांच्या दोन जोड्या (दोन नर आणि दोन मादी) मुंबईला देण्याची आग्रही विनंती केली आहे.
राणीच्या बागेच्या आधुनिकीकरण प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यात आशियाई सिंहांच्या राहणीमानानुसार विशेष नैसर्गिक अधिवास तयार करण्यात आला आहे. गुजरातच्या गीर जंगलातील ‘मालधारी’ समुदायाच्या घरांप्रमाणे मातीची घरे आणि गवताची छपरे असलेले हे दालन पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल, अशी रचना करण्यात आली आहे; मात्र दालन सज्ज होऊनही गेली पाच वर्षे येथे सिंह उपलब्ध होऊ शकलेले नाहीत, ज्यामुळे पर्यटकांमध्ये मोठी निराशा आहे. २०१९ मध्ये जुनागड येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयासोबत सिंहांच्या बदल्यात झेब्रा देण्याचा करार झाला होता; मात्र मुंबई महापालिकेकडे झेब्रा उपलब्ध नसल्यामुळे हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आता थेट गुजरात सरकारकडे धाव घेतली आहे.
पर्यटकांना वेध
२०१९ पासून सिंहांच्या बदल्यात प्राण्यांची देवाणघेवाण रखडलेली आहे. सिंहांच्या निवासासाठी पाणी, सावली, उंच मचाण आणि मोठ्या गुहांची शास्त्रीय पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे. राणीच्या बागेत पेंग्विन, वाघ आणि बिबट्या आल्यानंतर आता पर्यटकांना वेध लागले आहेत ते आशियाई सिंहांच्या गर्जनांचे. मुंबईकरांचे हे स्वप्न पूर्ण करा, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे.
........
मुंबईकरांना आणि विशेषतः लहान मुलांना आशियाई सिंह पाहता यावेत, यासाठी गुजरात सरकारने सदिच्छा म्हणून दोन जोड्या सिंह द्यावेत. यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून मुंबईकरांची ही इच्छा पूर्ण करावी.
- रितू तावडे, महापौर
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.