स्वतंत्र वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग स्थापन करा
केरळच्या प्रणालीचा आदर्श घेण्याची वन्यजीवप्रेमींची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्यातील वन्यजीव शिकारीच्या वाढत्या घटना आणि संघटित तस्करीला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र महाराष्ट्र वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग स्थापन करावा, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव वन्यजीवप्रेमींनी राज्य वनविभागाला सादर केला आहे. केरळ राज्याने राबविलेल्या यशस्वी एचएडब्ल्यूके (होस्टाईल ॲक्टिव्हिटी वॉच केरनेल) डिजिटल प्रणालीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अशी यंत्रणा उभारणे काळाची गरज असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
सध्या वन्यजीव गुन्हे हे केवळ स्थानिक राहिलेले नसून ते आंतरराष्ट्रीय तस्करीच्या जाळ्याशी जोडले गेले आहेत. अशा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी केवळ पारंपरिक पद्धती पुरेशा ठरत नाहीत. केरळ वनविभागाने २०२० पासून कार्यरत केलेली डब्ल्यूएएचके प्रणाली ही एक केंद्रीकृत डिजिटल व्यवस्था आहे. यात वनगुन्ह्यांची नोंद, आरोपींचा डेटाबेस आणि वन्यजीवांच्या मृत्यूचे विश्लेषण एकाच सुरक्षित मंचावर केले जाते. कर्नाटक सरकारनेही ही प्रणाली स्वीकारली असून, महाराष्ट्रानेही अशाचप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वन्यजीवप्रेमींनी आपल्या काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. हस्तिदंत, कातडी आणि चंदनाची तस्करी रोखण्यासाठी विशेष गुप्तचर यंत्रणा उभारावी, आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करावा, केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो आणि इतर राज्यांच्या यंत्रणांशी समन्वय साधून आधुनिक प्रशिक्षण द्यावे, वन अधिकाऱ्यांच्या कामाच्या मूल्यमापनात वन्यजीव गुन्ह्यांची नोंद आणि यशस्वी दोषसिद्धी या निकषांचा समावेश करावा.
तस्करी मोडीत काढता येईल
हा प्रस्ताव सादर करणारे वन्यजीवप्रेमी रोहन भाटे-शहा यांनी स्वतःच्या अनुभवातून या यंत्रणेची गरज अधोरेखित केली आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक माहितीदारांच्या जाळ्याद्वारे वनविभागाला वेळोवेळी दिलेल्या माहितीमुळे गेल्या काही वर्षांत सुमारे १७५ आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. यात हस्तिदंत, वाघाची कातडी आणि शिंगे यांसारख्या मौल्यवान वस्तूंची जप्ती करण्यात आली. जर एक सामान्य नागरिक मर्यादित संसाधनांतून इतकी मोठी मदत करू शकतो, तर सरकारी स्तरावर स्वतंत्र विभाग असल्यास शिकार आणि तस्करी पूर्णपणे मोडीत काढता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.