कीटकजन्य आजारांत मुंबई आघाडीवर
राज्यातील २,३९२ रुग्णांपैकी मलेरियाचे ९१८ रुग्ण मुंबईत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : साधारणपणे पावसाळ्यात वाढणारे कीटकजन्य आजार यंदा ऐन उन्हाळ्यातच डोके वर काढताना दिसत आहेत. राज्यातील अनेक भागांत मलेरिया, डेंगी आणि चिकुनगुनिया या आजारांचे रुग्ण वाढले असून, जानेवारी ते ७ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरात एकूण २,३९२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी मुंबईत मलेरियाचे ९१८ आणि डेंगीचे १८२ रुग्ण आढळले असून, महानगरात कीटकजन्य आजारांचा प्रभाव सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
साधारणतः पावसाळ्यात डासांची संख्या वाढल्याने मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. मात्र, यंदा हवामानातील बदल, वाढते तापमान आणि काही भागांत साचलेले पाणी यामुळे हिवाळा आणि उन्हाळ्यातही या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या आकडेवारीनुसार या कालावधीत राज्यात १,३३५ मलेरिया, ८२३ डेंगी आणि २३४ चिकुनगुनिया रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे या तिन्ही आजारांमुळे अद्याप एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
मुंबईत कीटकजन्य आजारांचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात मलेरियाचे ९१८ रुग्ण नोंदवले गेले असून, त्यापैकी २२२ रुग्ण प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम प्रकारातील आहेत, जो तुलनेने गंभीर मानला जातो. तसेच १०४ रुग्ण बाहेरून आलेले असल्याची नोंद आहे.
डेंगीच्या बाबतीतही मुंबई आघाडीवर असून, येथे १८२ रुग्ण आढळले आहेत, तर चिकुनगुनियाचे नऊ रुग्ण नोंदवले गेले आहेत.
आरोग्य विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. घराच्या आसपास पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे, मच्छरदाणीचा वापर करणे तसेच ताप, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या किंवा प्लेटलेट्स कमी होण्याची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मलेरियाची स्थिती
जिल्हा रुग्णसंख्या
मुंबई- ९१८
गडचिरोली-१४१
रायगड-३९
अमरावती-१०
रत्नागिरी-८
चंद्रपूर-७
वर्षे - मलेरियाच्या रुग्णांची नोंद - मृत्यू
२०२५ - २२,८३८ - २८
७ मार्च २०२६ पर्यंत - १३३५ - ०
--
वर्षे - डेंगीच्या रुग्णांची नोंद - मृत्यू
२०२५ - १४,१६८ - २४
७ मार्च २०२६ पर्यंत - ८२३ - ०
--
वर्ष - चिकुनगुनिया - मृत्यू
२०२५ - ३,४४४ - ०
७ मार्च २०२६ पर्यंत - २३४ - ०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.