इंधन तुटवड्याच्या भीतीने चोरट्यांवर पोलिसांची नजर
इराण युद्ध पार्श्वभूमीवर मुंबईत काळाबाजार रोखण्याची तयारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी इंधन चोरांच्या संघटित डोळ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. युद्धाची झळ विविध प्रकारे भारताला बसत असून, एलपीजी पुरवठा विस्कळित झाल्याने भविष्यात पेट्रोल, डिझेल तुटवडा निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर काळाबाजार आणि चोरीचे प्रकार सुरू होतील, हा अंदाज बांधून खबरदारीचा उपाय म्हणून ही पाऊल उचलले आहे.
आवश्यक वस्तू, सेवा विशेषतः अन्न धान्य, इंधन, भाजपाला आदी वस्तूंचा पुरवठा खंडित होतो, विस्कळित होतो, तेव्हा आपोआप त्या महाग होतात. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या वस्तू, सेवा पोहोचाव्यात या उद्देशाने शासन स्तरावरून निरनिराळे निर्बंध जारी केले जातात. याच काळात या वस्तू किंवा सेवांचा काळाबाजार सर्वाधिक होतो. तसेच त्यांची चोरीही मोठ्या प्रमाणात होते.
काही वर्षांपूर्वी बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला. आवक घटली, भाव गगनाला भिडले. आवक सुरळीत होईपर्यंत मुंबई महानगरात कांदा चोरीचे अनेक गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत नोंद झाले. हा अनुभव गाठीशी असल्याने मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक असलेले इंधन विविध प्रकारे चोरून, साठा करून विकणाऱ्या टोळ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
शहरात इंधन चोरांच्या टोळ्या विशेषतः पेट्रोल, डिझेल चोरून ते खुल्या बाजारात मागणीनुसार विकणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्या कप्तानाशी संगनमत करून परदेशी मालवाहू गलबतांमधील हायस्पीड इंधन चोरतात, वितरणासाठी निघालेल्या विविध तेल कंपन्यांच्या टँकरमधील काही अंशी साठा संगनमताने (चालकाच्या) काढून घेतात आणि त्याची अवैधरीत्या विक्री करतात, तेल शुद्धीकरण प्रकल्पातून राज्यात पसरलेल्या तेलवाहिन्या ठिकठिकाणी फोडून चोरी करतात. अशा टोळ्यांना मुंबई पोलिसांसह अन्य यंत्रणांनी अनेकदा रंगेहाथ पकडून मोठ्या प्रमाणात चोरलेला इंधनसाठा जप्त केला आहे.
मुंबईसारख्या शहरात रस्त्यांवर लागणाऱ्या चहापासून चमचमीत खाद्यपदार्थांच्या बहुतांश गाड्या ब्लॅकच्या गॅस सिलिंडरवर चालतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत रस्त्यावर अवैधरीत्या खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना गॅस पूर्वीप्रमाणे सहजरीत्या उपलब्ध होणार नाही, अशी परिस्थिती आहे. ती ओढवल्यास काळाबाजार सुरू होऊ शकतो.
युद्ध आणखी चिघळले आणि देशाची इंधन भूक भागवण्यासाठी हार्मोस सामुद्रधुनी टाकून जगाच्या अन्य कानाकोपऱ्यातून खनिज तेल, नैसर्गिक गॅसची आवक वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडल्यास मुंबईसारखी महानगरे काळाबाजार जन्माला घालतील. अलीकडेच उत्तर प्रदेशात गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक चोरी झाला. त्यातील सर्व सिलिंडर चोरून ट्रक भलतीकडेच बेवारस अवस्थेत सोडण्यात आला. या घटनेवरून चोरांना फक्त गॅसची निकड होती, हे स्पष्ट होते. अशा घटना मुंबई महानगर प्रदेशातही घडू शकतात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सूचना जारी
सध्या इराण युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरवर अघोषित निर्बंध लागू झाले आहेत. या परिस्थितीत भविष्यातील तरतूद म्हणून घरगुती आणि व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर वैध ग्राहकांना उपलब्ध व्हावा या उद्देशाने शासन स्तरावरून काळाबाजार रोखण्याच्या सूचना जारी झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.