बांबू लागवड उत्तम पर्याय
वाढत्या उष्णतेवर मात शक्य : पाशा पटेल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : ‘‘बांबू ही केवळ एक वनस्पती नसून ते भविष्यातील पर्यावरणपूरक क्रांतीचे साधन आहे. वाढत्या जागतिक तापमानावर आणि उष्णतेवर मात करण्यासाठी बांबू लागवड हा सर्वात प्रभावी आणि शाश्वत पर्याय आहे,’’ असे प्रतिपादन कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (भायखळा) पेंग्विन सभागृहात आयोजित ‘बांबू लागवड : विविध योजना व महत्त्व’ या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. बांबू लागवडीमुळे मृदा संवर्धन होते. हरित आच्छादन वेगाने वाढते. कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी बांबू हे कार्बन-प्रधान साहित्याला उत्तम पर्याय ठरू शकते. पर्यावरण संतुलनासाठी युवक, औद्योगिक संस्था आणि सेवाभावी संस्थांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पाशा पटेल यांनी केले. अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले की, शहरात जिथे मोठी झाडे लावणे शक्य नाही, तिथे बांबू लागवड करून नागरी परिसंस्था सक्षम करता येईल.
कार्यशाळेला जपानचे महावाणिज्यदूत तोशिहिरो कानेको यांची विशेष उपस्थिती होती. जपानी संस्कृतीत बांबूचे असलेले महत्त्व सांगतानाच, या क्षेत्रात भारत आणि जपानमधील सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय, त्रिपुरा येथील मुथा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अनिल मुथा, कृणाल नेगांधी (जुरियन सस्टेनेबिलिटी) आणि संजीव कर्पे (कोकण बांबू सेंटर) यांनी बांबू लागवडीचे शास्त्रीय, आर्थिक आणि व्यावहारिक पैलू उपस्थितांसमोर मांडले.
याप्रसंगी उपआयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत मुंबईच्या हवामानासाठी अनुकूल असलेल्या बांबूच्या प्रजाती आणि शासकीय योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.