‘एशियाटिक’ची निवडणूक पुन्हा स्थगित
के. डी. तळोकार प्रशासकपदी; नवे मतदार अवैध ठरण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : दी एशियाटिक सोसायटीच्या बहुचर्चित निवडणुकीच्या मार्गातील विघ्न संपताना दिसत नाही. मतदार यादीतील गाेंधळामुळे धर्मादाय आयुक्तांनी शनिवारी (ता. १४) होणारी नियोजित निवडणूक पुन्हा स्थगित केली आहे. आता ही निवडणूक तीन महिन्यांपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. चौकशी अधिकारी के. डी. तळोकार यांना सोसायटीच्या प्रशासकपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन समिती नव्याने पात्र मतदारांची यादी तयार करण्याचे काम करणार आहे.
एशियाटिकच्या व्यवस्थापनाबद्दल काही तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे धर्मादाय आयुक्तांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे एशियाटिकच्या नव्या सदस्यांच्या मतदानाच्या अधिकारावर टांगती तलवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ३० सप्टेंबर २०२३ला झालेल्या निवडणुकीनंतर तत्कालीन व्यवस्थापन समितीने निवडणूक बदल अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पाठवला होता; मात्र तो आयुक्तांनी फेटाळला होता. त्यानंतर चौकशी अहवालाच्या आधारे धर्मादाय आयुक्तांनी शुक्रवारी (ता. १३) निवडणूक स्थगित करण्याचा आदेश जारी केला आहे. चौकशी अधिकारी के. डी. तळोकार यांना एशियाटिक सोसायटीच्या प्रशासकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली २०२४-२०२७ या कार्यकाळासाठी नियुक्त केलेली व्यवस्थापन समिती सोसायटीचा दैनंदिन कारभार चालवणार आहे. यासोबतच नव्याने पात्र मतदार तसेच मतदार यादी तयार करण्याचे काम करणार आहे, असे आदेश या निकालपत्रात देण्यात आले आहेत. व्यवस्थापन समितीत मंदार भारदे, सुरेंंद्र कुलकर्णी, विवेक गणपुले, कुमार केतकर, सूरज पंडित यांचा समावेश आहे. विवेक गणपुले आणि कुमार केतकर हे उमेदवार असल्यामुळे दोघेही मतदार यादी आणि योग्य मतदार निवडीच्या कामात सहभागी होणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
-----
मतदार यादीसाठी दाेन महिने
उपसमितीला आजपासून दोन महिन्यांच्या कालावधीत वैध मतदारांची यादी तयार करण्याची मुदत देण्यात आली आहे. ही यादी एशियाटिकच्या वेबसाइटवर प्रकाशित करून त्यावर १५ दिवसांत हरकती मागवण्याचे निकालपत्रात सूचित केले आहे. अंतिम मतदार यादी तयार झाल्यानंतर महिनाभरात मतदान घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. उपधर्मादाय उपायुक्तांच्या देखरेखीखाली या निवडणुका घेतल्या जातील, असेही धर्मादाय आयुक्तांनी आपल्या निकालपत्रात स्पष्ट केले आहे.
----
मतदारांवर टांगती तलवार
२०२५मध्ये साडेतीन हजारांहून जास्त जणांनी एशियाटिकचे सदस्यत्व घेतले होते. यातील वार्षिक सदस्यत्व घेणाऱ्यांची सदस्यपदाची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. या सदस्यांची संख्या ७० ते ८० टक्के आहे. त्यामुळे नूतनीकरण केले तरी त्यांना मतदानाची संधी मिळणे जवळपास अशक्य आहे. शिवाय २०२४-२५साठी अर्ज छाननी समितीचा कालावधी २७ सप्टेंबर २०२५ला संपुष्टात आला होता. यानंतर त्यांनी मंजूर केलेले सदस्य हे नियमाबाह्य असल्याचे निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या सदस्यांच्या मतदानावर टांगती तलवार कायम असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.