‘रेल वन’चा ‘डिजिटल’ गोंधळ!
पैसे वजा होऊनही तिकीट दिसेना; समाजमाध्यमांवर संताप
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : प्रवाशांना रेल्वेच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने नुकतेच ‘रेल वन’ ॲप सेवेत आणले. ॲपवरून तिकीट आरक्षित केल्यानंतर बँक खात्यातून पैसे वजा होतात; मात्र ॲपमध्ये तिकीट दिसत नसल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजमाध्यमांवर प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.
अनेक वर्षांपासून वापरात असलेले यूटीएस ॲप टप्प्याटप्प्याने बंद करून प्रवाशांना ‘रेल वन’ ॲप वापरण्याचे आवाहन करण्यात आले. रेल्वेकडून या ॲपची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीही करण्यात आली; मात्र प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतर ॲपमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे प्रवासी सांगत आहेत. मानवेंद्र राघव यांनी गावी जाण्यासाठी ‘रेल वन’ ॲपद्वारे तत्काळ तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. तिकीट काढल्यावर त्यांच्या खात्यातून ६७३.१५ रुपये वजा झाल्याचा बँकेचा संदेशही मिळाला; मात्र सहा तास उलटूनही तिकीट बुकिंगचा कोणताही संदेश, ई-मेल किंवा ॲपमध्ये नोंद दिसत नसल्याची तक्रार त्यांनी केली. आनंद श्री या प्रवाशानेही जानेवारी महिन्यात या ॲपद्वारे तिकीट काढले. त्या वेळी ‘माय बुकिंग’ विभागात तिकीट दिसत होते; मात्र कार्यालयीन कारणासाठी या तिकिटाची प्रत काढण्याचा प्रयत्न केल्यावर ‘जर्नी कम्प्लिट’ विभागात तिकीट दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
----
डिजिटल सेवांबाबत प्रश्नचिन्ह
पैसे वजा झाल्यास लगेच तिकीट द्यावे किंवा मुदतीत परतावा द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. यासंदर्भात रेल्वेकडे तक्रार केल्यानंतर आवश्यक कार्यवाहीसाठी तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात असल्याचे प्रवासी सांगत आहेत; मात्र त्यावर अद्याप तोडगा काढला जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. ॲपमधील त्रुटी तातडीने दुरुस्त करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली.
-------
रेल्वे प्रशासन काय म्हणते?
प्रवाशांसाठी उपलब्ध असलेली विविध रेल्वे ॲप्स एकत्रित करून ‘रेल वन’मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डेटा स्थलांतर (मायग्रेशन) करण्यात आल्याने सुरुवातीच्या टप्प्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. ॲप पूर्णपणे स्थिर होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.