पुनर्विकासाचा गोंगाट; मुंबईकर त्रस्त
बांधकाम वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई महानगर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या हजारो पुनर्विकास प्रकल्पांमुळे मुंबईकर दुहेरी संकटात सापडले आहेत. खालावलेली हवेची गुणवत्ता आणि आता असह्य झालेला यंत्रांचा आवाज, यामुळे नागरिक शारीरिक आणि मानसिक व्याधींनी त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर, बांधकामाच्या वेळा सकाळी ६ ते रात्री १० ऐवजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ करण्याची आग्रही मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे.
केवळ विद्यार्थीच नव्हे, तर घरात असलेले हृदयविकाराचे रुग्ण, अंथरुणाला खिळलेले ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना या आवाजाचा सर्वाधिक फटका बसत आहे. अवजड यंत्रसामग्रीमुळे होणाऱ्या आवाजाचा स्थानिक रहिवाशांचा प्रचंड त्रास होत आहे. अपुरी झोप आणि मानसिक तणावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते ग्यान सी. चड्डा यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात पुणे महापालिकेचा दाखला दिला आहे.
मुंबईत सध्या सुमारे चार ते पाच हजार पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. विकास, पैसा आणि व्यवसाय महत्त्वाचा असला तरी, मानवी जीवन आणि शांतता त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. केवळ हवेच्या प्रदूषणाने मुंबईकर आधीच त्रस्त असताना, आता आवाजाच्या प्रदूषणाने जगणे कठीण झाले आहे, असे चड्डा यांनी पत्रात नमूद केले आहे. वाढत्या वाहतुकीचे हॉर्न आणि बांधकामांचा आवाज यावर वेळीच नियंत्रण न आल्यास मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कडक नियमावली लागू करा
पुण्यात प्रदूषण आणि आवाजावर नियंत्रण मिळवण्यासाठी बांधकामाची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ अशी मर्यादित करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर मुंबईतही कडक नियमावली लागू करण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते ग्यान सी. चड्डा यांनी व्यक्त केली आहे.
मानसिक आरोग्यावर परिणाम
सध्या शाळा-महाविद्यालयांच्या अंतिम परीक्षांचा काळ सुरू आहे. मात्र, बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या पायलिंग, ड्रिलिंग आणि खोदकामाच्या प्रचंड आवाजामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता भंग पावत आहे. सततच्या आवाजामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.