सीटीस्कॅनसाठी ‘डाय’वरून वाद
‘मानवाधिकार’च्या नोटिशीनंतर पालिकेला जाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर सुरू असलेल्या सीटीस्कॅन केंद्रांमध्ये कॉन्ट्रास्ट सीटीस्कॅनसाठी रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीनंतर तब्बल अडीच वर्षांनी महापालिका प्रशासनाने हालचाल सुरू केली असून, कॉन्ट्रास्ट तपासणीसाठी लागणारा ‘डाय’ रुग्णालयाकडून उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
महापालिकेच्या ताब्यात सीटीस्कॅन सेवा असताना साधा तसेच कॉन्ट्रास्ट अशा दोन्ही प्रकारचे सीटीस्कॅन सुमारे १,२०० रुपयांत केले जात होते. कॉन्ट्रास्टसाठी लागणारा ‘डाय’ महापालिकेच्या औषध यादीत समाविष्ट असल्याने तो रुग्णालयाकडूनच पुरवला जात होता; मात्र पीपीपी पद्धती लागू झाल्यानंतर काही केंद्रांमध्ये १,२०० रुपयांत साधा सीटीस्कॅन केला जात असला, तरी कॉन्ट्रास्ट सीटीस्कॅनसाठी रुग्णांकडून अतिरिक्त १,८४८ रुपये आकारले जात असल्याची तक्रार पुढे आली. त्यामुळे एका तपासणीसाठी रुग्णांना सुमारे ३,०४८ रुपये मोजावे लागत असल्याचे उघड झाले. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते ॲड. तुषार भोसले यांनी सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात सुरू असलेल्या सीटीस्कॅन सेवांबाबत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आयोगाने या तक्रारीची दखल घेत नोटीस बजावल्यानंतर संबंधित रुग्णालय प्रशासनाने लेखी उत्तर देत महापालिकेच्या रुग्णांसाठी कॉन्ट्रास्ट ‘डाय’ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट केले.
----
अनेक रुग्णालयांत सेवा
महापालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये पीपीपी तत्त्वावर सीटीस्कॅन सेवा दिल्या जातात. कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय आणि कूपर रुग्णालयात खासगी संस्थांमार्फत ही सेवा चालवली जाते. मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीनंतर या ठिकाणी ही अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्यास ती थांबवण्याची मागणी केली जात आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.