गुढीपाडवा शोभायात्रांसाठी मुंबई सज्ज
वरळीतून भव्य मिरवणूक; महिला बाइक रॅली आणि सांस्कृतिक देखाव्यांचे आकर्षण
मुंबई, ता. १८ ः हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक उत्साहात आणि मराठमोळ्या थाटात करण्यासाठी मुंबईनगरी सज्ज झाली आहे. नऊवारीचा साज, भव्य रांगोळी, फोटोसेशन, झिम्मा-फुगडी मंगळागौरीचे खेळ, पारंपरिक पेहरावातील साजशृंगार आणि याचसोबत नववर्षाचे स्वागत होणार आहे.
गुढीपाडवा आणि शोभायात्रेचे समीकरण आपली संस्कृतीदर्शक असून ढोल-ताशा, सनई चौघडा, सडा रांगोळी, दारी तोरण, मंगलमय व प्रसन्न वातावरणात एकत्र कुटुंब पद्धती हा जिव्हाळ्याचा विषय आहे. ८२ वर्षांची आजी ते लहान मुलांपर्यंत, प्रत्येक वयोगटातील मंडळींचा सहभाग असतो.
हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक उत्साहात आणि मराठमोळ्या थाटात करण्यासाठी वरळी परिसरात भव्य गुढीपाडवा शोभायात्रा २०२६चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसह्याद्री फाउंडेशन आणि ‘आम्ही वरळीकर’ या संकल्पनेतून आयोजित या शोभायात्रेचे यंदा सोळावे वर्ष आहे. या वेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील सामाजिक संस्था, मंडळे, ट्रस्ट, सर्व राजकीय संघटना तसेच नागरिकांनी सहकुटुंब या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक शिवसह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कदम आणि सरचिटणीस महेश खवणेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शोभायात्रेला गुरुवारी (ता. १९) सकाळी ७.३० वाजता जांबोरी मैदान येथून प्रारंभ होईल. मान्यवरांच्या हस्ते गुढी उभी करून, विश्वशांती प्रार्थना व शालेय विद्यार्थ्यांच्या सामूहिक महाराष्ट्र गीतांनी शोभायात्रेची सुरुवात होणार असून पारंपरिक वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, जव्हार येथील तारपा नृत्य, आकर्षक गुढ्या आणि विविध सांस्कृतिक देखावे यांचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषा आणि मराठी शाळांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मराठी शाळा’ या विषयावर भव्य रील स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत विजेत्यांना ५० हजार रुपयांहून अधिक रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत.
मुंबईतील गिरगाव परिसरात शोभायात्रा पाहण्यासाठी सकाळपासून तरुण मंडळी गर्दी करतात. मर्दानी आणि मैदानी साहसी खेळ, दांडपट्टा, सोबतच मल्लखांब असे सर्व प्रकार या शोभायात्रेदरम्यान पाहायला मिळतील. नेहमीप्रमाणे शोभायात्रेचे वेगळेपण राखत यंदा अनेक मंडळे, पारंपरिक साहसी खेळ खेळणारी प्रशिक्षित मुले-मुली आणि वेगवेगळे मोठे चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. सर्वात प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे महिला, तरुणी आणि पुरुषांची बाइक रॅलीचे असते.
या शोभायात्रेमध्ये अनेक महिला मोठ्या संख्येने सहभाग घेतात. आकर्षक सुंदर साडी, पारंपरिक दागिने, नाकात नथ आणि सजवलेल्या बुलेटवर या महिलांची शोभायात्रेत एन्ट्री होते. रॉयल वेषात बुलेटधारी महिलांचा अंदाज आकर्षण ठरतो. शोभायात्रेसाठी महिलांसह अनेक तरुण तसेच लहान मुलांचाही सहभाग असतो.
महिला उभारणार गुढी
वरळीत ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्य चित्ररथ, बाइक रॅली, साई पालखी सोहळ्याची मिरवणूक, वारकरी भक्तिमय गजर, लेझीम पथक आणि भव्य ढोलपथक या आकर्षणामुळे शोभायात्रेला विशेष रंगत येईल. जागतिक महिला दिनाचा सन्मान म्हणून यंदाची गुढी महिलांच्या हस्ते उभारण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.