गाड्या घेणे महागणार
प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण करात दुपटीने वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : राज्यातील वायुप्रदूषणाची समस्या गंभीर होत असताना, जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, २०२६’ बुधवारी (ता. १८) विधिमंडळात एकमताने मंजूर झाले. या विधेयकाद्वारे पर्यावरण करात दुप्पट वाढ करण्यात आली असून, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली. परिणामी गाड्या घेणे महागणार आहे.
दुचाकी वाहनांसाठी हा पर्यावरण कर २,००० वरून ४,००० रुपये करण्यात आला आहे. पेट्रोल वाहनांसाठी ३,००० ऐवजी आता ६,००० रुपये आणि डिझेल वाहनांसाठी ३,५०० च्या जागी ७,००० रुपये इतका कर आकारला जाणार आहे. हा कर पाच वर्षांसाठी एकरकमी भरावा लागेल, या करवाढीमुळे राज्याला दरवर्षी १६० कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल. हा निधी रस्ता सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, एटीएस प्रणाली आणि प्रशिक्षणासाठी खर्च केला जाईल. तसेच, क्रेन वाहनांवरील मोटार वाहन कराची कमाल मर्यादा ३० लाख रुपयांवर निश्चित करून औद्योगिक क्षेत्राला दिलासा दिला आहे. या विधेयकामुळे नागरिकांना ‘बीएस-६’ आणि इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन मिळणार असून, राज्याच्या पर्यावरणीय धोरणाला बळकटी मिळेल. याशिवाय ग्रामीण आणि आदिवासी भागात दरवर्षी जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महसूलवाढीस मदत
महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, २०२६ या विधेयकामुळे राज्याच्या एकत्रित निधीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसून याउलट महसूलवाढीस मदत होणार आहे. सभागृहातील सर्व पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाचे स्वागत करत एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री