वांद्रे येथे रेल्वेचा अतिक्रमणांवर बडगा
व्हायरल व्हिडिओनंतर ६५ झोपड्यांवर हातोडा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील कचरा आणि रेल्वे रुळांलगत उभारलेल्या अतिक्रमणांचे व्हिडिओ काही विदेशी पर्यटकांनी सोशल मीडियावर शेअर केले हाेते. या व्हिडिओंची दखल घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने वांद्रे (पूर्व) येथील गरीबनगर परिसरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. यात रेल्वे हद्दीतील सुमारे ६५ बेकायदा झोपड्या आणि बांधकामे हटविण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (ता. १७) करण्यात आली.
सांताक्रूझ येथील वरिष्ठ विभाग अभियंता (जमीन) कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. रेल्वेचा अभियांत्रिकी विभाग, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), लोहमार्ग पोलिस (जीआरपी) आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईसाठी पाच जेसीबी, दोन ट्रक आणि सुमारे ३८ कामगारांची मदत घेण्यात आली. रेल्वेच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पाडकामानंतर निर्माण झालेला मलबा रेल्वे हद्दीबाहेर हलवण्यात आला. कारवाईदरम्यान कोणतीही कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून वैद्यकीय पथकासह एक रुग्णवाहिकाही घटनास्थळी तैनात करण्यात आली होती.
नियमित पाहणी सुरू
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, वांद्रे परिसरात नव्याने होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी नियमित पाहणी केली जाणार आहे. बेकायदा झोपड्या किंवा बांधकामे आढळल्यास तत्काळ पाडकामाची कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
----
काय होता व्हिडिओ?
विदेशी पर्यटकांनी वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील परिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडिओंमध्ये रुळांजवळ साचलेला कचरा, रेल्वे रुळांच्या अगदी जवळ उभारलेल्या झोपड्यांची दृश्ये दिसत होती. एका पर्यटकाने व्हिडिओमध्ये ‘हे रेल्वे स्टेशन आहे की कचराकुंडी’ असा प्रश्न उपस्थित करून परिसरातील स्वच्छतेबाबत आश्चर्य व्यक्त केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.