प्रमुख पालिका रुग्णालयांत एमआरआय सेवा क्षमता वाढ
निविदा प्रक्रिया पूर्ण; कार्यादेश जारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये लवकरच एमआरआय सेवा उपलब्ध होणार असून, यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित कंत्राटदाराला (सर्वात कमी दर) आधारावर काम देण्यात आले असून, प्रत्येक रुग्णालयासाठी स्वतंत्र वर्क ऑर्डर जारी करण्यात आली आहे, अशी माहिती प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली. त्यामुळे मुंबईतील सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, महानगरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या केईएम, नायर, कूपर आणि सायन या चार महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये ही अत्याधुनिक एमआरआय सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांना खासगी केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार असून, कमी खर्चात आणि वेळेत निदान होण्यास मदत होणार आहे.
एमआरआय ही अत्यंत महत्त्वाची निदान चाचणी असून मेंदू, मणका, स्नायू तसेच अंतर्गत अवयवांशी संबंधित आजारांचे अचूक निदान करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. मात्र, आतापर्यंत पालिका रुग्णालयांमध्ये ही सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
दरम्यान, एमआरआय सेवेसाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने मागणी होत होती. विधिमंडळाच्या अधिवेशनातही या मुद्द्यावर वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने या प्रक्रियेला गती देत टेंडर पूर्ण करून आता प्रत्यक्ष सेवा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये एमआरआय सेवा सुरू करण्यासाठीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून वर्क ऑर्डरही जारी करण्यात आल्या आहेत. ही सेवा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना कमी खर्चात आणि जलद गतीने निदानाची सुविधा मिळेल. तसेच रुग्णालयांवरील ताण कमी होऊन आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल,
-डॉ. शैलेश मोहिते, संचालक, पालिका प्रमुख रुग्णालये.
प्रतीक्षा यादी होणार कमी
सध्या असलेली दीर्घ प्रतीक्षा यादी मोठ्या प्रमाणात घटेल, आजारांचे लवकर व अचूक निदान होईल, खासगी केंद्रांच्या तुलनेत स्वस्त दरात सेवा मिळेल, स्थानिक पातळीवर सुविधा, रुग्णांचा वेळ वाचेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.