बालकांमध्ये श्वसन संसर्गाची झपाट्याने वाढ
२०२४ मधील २ प्रकरणे २०२५ मध्ये १०२ वर; तज्ज्ञांची चिंता
मुंबई, ता. २१ : शहरातील वाढत्या वायुप्रदूषणाचा परिणाम आता मुलांच्या आरोग्यावर गंभीर स्वरूपात दिसून येत आहे. राज्य सरकारच्या कामा अँड अल्बलेस रुग्णालयातील आकडेवारीनुसार, १० वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये श्वसन संसर्गाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेषतः वरच्या श्वसन मार्गातील संसर्गाच्या प्रकरणांमध्ये गेल्या दोन वर्षांत लक्षणीय वाढ झाल्याने आरोग्यतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभाग आणि मातृ-शिशु आरोग्य केंद्राच्या नोंदींनुसार, वर्ष २०२४ मध्ये अशा संसर्गाची केवळ दोन प्रकरणे नोंदविण्यात आली होती. मात्र, वर्ष २०२५ मध्ये ही संख्या थेट १०२ वर पोहोचली आहे. या वाढीमुळे वायुप्रदूषण, हवामानातील बदल आणि स्वच्छतेअभावी मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले जात आहे.
कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, वरच्या श्वसन मार्गातील संसर्ग ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य समस्या असली तरी तिचे प्रमाण वाढणे चिंताजनक आहे. या संसर्गामध्ये सर्दी, सायनस, घशाचा संसर्ग आणि लॅरिंजायटिस यांचा समावेश होतो. प्रदूषण, स्वच्छतेचा अभाव, हवामानातील बदल, थंडीचे प्रमाण आणि गर्दी ही या वाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, खालच्या श्वसन मार्गातील संसर्ग अधिक गंभीर असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. अशा रुग्णांना प्रतिजैविके, ऑक्सिजन सहाय्य किंवा रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते. या संसर्गाच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली असून, वर्ष २०२४ मधील १९ प्रकरणे वाढून २०२५ मध्ये ५९ वर पोहोचली आहेत.
फुप्फुसांवर परिणाम
या संसर्गाचा परिणाम ब्रॉन्कायटिस आणि फुप्फुसांवर होतो आणि तो विषाणू किंवा जीवाणूंमुळे पसरतो. त्यामुळे पालकांनी मुलांना प्रदूषणापासून दूर ठेवावे, स्वच्छता पाळावी आणि लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.