गिरगाव मॅथ्यू रोडवरील मालमत्तेचा होणार विस्तार
५० टक्के सेवा मार्गिका भूखंडात विलीन करण्यास पालिकेची मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : दक्षिण मुंबईतील गिरगाव विभागातील मॅथ्यू रोड येथील एका महत्त्वाच्या भूखंडालगत असलेली सेवा मार्गिका संबंधित भूखंडात विलीन करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या विलीनीकरणामुळे संबंधित मक्तेदाराला जादा चटईक्षेत्र निर्देशांकाचा (एफएसआय ) लाभ मिळणार असून, त्याबदल्यात पालिकेच्या तिजोरीत ८५ लाख रुपयांचे अधिमूल्य जमा होणार आहे.
या प्रस्तावावर येत्या सुधार समितीच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
गिरगाव विभागातील मॅथ्यू रोड येथील सुमारे ९७८.२७ चौरस मीटरचा भूखंड ‘इज गी लाइफस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडे ९३६ वर्षांच्या दीर्घ मुदतीने लिजने देण्यात आला आहे. या भूखंडालगत असलेल्या सेवा मार्गिकेचे ५० टक्के क्षेत्र (सुमारे ४२.४२ चौ. मी.) मूळ भूखंडात विलीन करून त्याचा एफएसआय मिळावा, अशी विनंती कंपनीच्या वास्तुविशारदांनी केली होती.
पूर्वी मुंबईत टोपली शौचालय पद्धत अस्तित्वात होती. सफाई कामगारांना सफाईसाठी सोयीचे व्हावे, यासाठी दोन भूखंडांमध्ये सेवा मार्गिका ठेवल्या जात असत. आता आधुनिक सांडपाणी निचरा यंत्रणेमुळे या मार्गिका अनावश्यक झाल्या आहेत. पालिकेच्या धोरणानुसार, अशा मार्गिका लगतच्या भूखंडधारकाला अधिमूल्य आकारून दिल्या जातात.
सेवा मार्गिकेखाली काही भूमिगत जलवाहिन्या असल्यास त्या स्थलांतरित करण्याचा खर्च मक्तेदाराला करावा लागेल. नवीन मक्ता दस्तऐवज स्वखर्चाने करावा लागेल.
न्यायालयाचा निर्णय
मक्ता भूभागाच्या वाढीव भुईभाड्याबाबत उच्च न्यायालयात काही याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे, या विलीनीकरणाची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहील. पालिकेने मक्तेदाराकडून त्याबाबतचे नोंदणीकृत हमीपत्र घेण्याची अट घातली आहे. या निर्णयामुळे गिरगावमधील या मोक्याच्या जागेवरील पुनर्विकासाचा मार्ग अधिक सुकर झाला असून, पालिकेलाही मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.