५५ कोटींच्या नादात
तीन लाख गमावले
मुंबई, ता. २३ : प्रभादेवी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाने ५५ कोटी मिळवण्याच्या नादात फसव्या ई-मेलला भुलून तीन लाख रुपये गमावले. नेदरलँडमधील अग्रगण्य बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे भासवून या तरुणासोबत ई-मेलद्वारे संपर्क साधणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात रविवारी दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
लक्ष्मीकांत अंबारे असे तरुणाचे नाव असून, एप्रिल २०२२मध्ये त्याला जेको मिनार नावाच्या व्यक्तीने ई-मेल पाठवून तो नेदरलँड येथील ट्रायडोस बँकेचा सीईओ असल्याचे भासवले. आपल्या बँकेत लॅक्स अंबारे या व्यक्तीचे खाते आहे. या व्यक्तीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून, त्याच्या खात्यावर नऊ मिलियन पाैंड (११० कोटी रुपये) आहेत. मृत्यूनंतर या व्यक्तीच्या नातेवाइकांनी अद्याप त्यावर दावा केलेला नाही. या व्यक्तीचे आणि तुमचे नाव सारखेच असल्याने तुम्ही दोघे नातेवाईक असल्याचे भासवणे शक्य होईल. किरकोळ प्रक्रिया पूर्ण केल्यावर ती रक्कम तुम्हाला मिळू शकेल. त्यानंतर आपण दोघे ती निम्मी-निम्मी वाटून घेऊ, असे कळवले.
जेकोने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एका सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधीशी अंबारेसोबत ई-मेलद्वारेच ओळख करून दिली. प्रक्रिया पूर्ण करण्याच्या निमित्ताने या प्रतिनिधीने पाैंडमध्ये रक्कम मागणे सुरू केले. त्यातील निम्मी रक्कम मी भरली, असे जेकोने भासवले. निम्मी तक्रारदारास भरण्यास भाग पाडले. पुढील काही महिन्यांत तक्रारदाराने साडेतीन लाख रुपये विविध खात्यांवर जमा केले. आणखी पैशांची मागणी होऊ लागल्याने तक्रारदाराने हात वर केले. २०२५ डिसेंबरपर्यंत जेको आणि संबंधित प्रतिनिधी तक्रारदाराच्या संपर्कात होते. ही फसवणूक सुरू असल्याचे लक्षात आल्याने तक्रारदाराने त्यांच्याकडे भारलेल्या तीन लाख रुपयांसाठी तगादा लावला, तेव्हा या दोघांनी संपर्क तोडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.