अँजिओग्राफीनंतर दाेन तासांत डिस्चार्ज
‘केईएम’ रुग्णालयात ‘रेडियल लाउंज’ सुरू
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये कार्डिओलॉजी विभागात अत्याधुनिक ‘रेडियल लाउंज’ सुरू करण्यात आले आहे. या सुविधेमुळे अँजिओग्राफी करणाऱ्या रुग्णांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वीप्रमाणे सात-आठ तास थांबण्याऐवजी केवळ दाेन तासांत रुग्णालयातून घरी साेडण्यात आले आहे.
नव्या पद्धतीत अँजिओग्राफी हाताच्या मनगटाद्वारे केली जाते. त्यामुळे रुग्णाला अॅडमिट करण्याची गरज भासत नाही. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला रिक्लायनरवर बसवून निरीक्षणाखाली ठेवले जाते. फार कमी वेळात त्याला घरी साेडण्यात येते. पारंपरिक पद्धतीत पायाद्वारे अँजिओग्राफी केल्यास रुग्णाला दीर्घकाळ विश्रांती घ्यावी लागते.
या प्रकल्पासाठी इंडियन ह्यूम पाइप कंपनी लिमिटेडने सीएसआरअंतर्गत सुमारे ७५ लाख रुपयांची मदत दिली आहे. यामध्ये रेडियल लाउंजसोबतच कार्डिओलॉजी एज्युकेशनल हब आणि ट्रेनिंग सेंटरचाही समावेश आहे.
डॉक्टरांच्या मते, या सुविधेमुळे उपचारांची गती वाढणार असून दररोज अधिक रुग्णांवर उपचार करणे शक्य होईल. याशिवाय पोर्टेबल इकोकार्डिओग्राफी मशीनमुळे तपासणीही अधिक जलद आणि अचूक होणार आहे.
------
शिक्षणासाठीही फायदा
कार्डिओलॉजी विभागातील आधुनिक ट्रेनिंग सेंटरमुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून ऑनलाइन मार्गदर्शन, लाइव्ह लेक्चर्स आणि प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे.
-----
इकोकार्डिओग्राफी मशीनही मिळणार
नव्या व्यवस्थेमुळे डॉक्टरांना जलद गतीने उपचार करता येणार असून दररोज सुमारे पाच अतिरिक्त रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयाला पोर्टेबल इकोकार्डिओग्राफी मशीनही देण्यात आली असून तपासणी अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.
---
मुख्य फायदे :
• दाेन तासांत डिस्चार्ज
• रुग्ण लगेच चालू-फिरू शकतो
• रक्तस्राव आणि गुंतागुंत कमी
• रुग्णालयात राहण्याचा वेळ कमी
• एकाच दिवशी प्रक्रिया आणि डिस्चार्ज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.