‘डेक्कन क्वीन’चा रेल्वे महोत्सव
ऐतिहासिक गाडीचे नूतनीकरण प्रवाशांसाठी आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे शुक्रवारी (ता. २७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रतिष्ठित डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा रेल्वे महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल ९५ वर्षांची परंपरा असलेल्या या ऐतिहासिक गाडीचा प्रवास, बदललेले स्वरूप आणि आधुनिक सुविधा यांची माहिती या वेळी प्रवाशांना देण्यात आली.
ट्रेन क्रमांक १२१२३/१२१२४ डेक्कन क्वीन गाडी सुटण्यापूर्वी सुमारे एक तास आधी फलाट क्रमांक १० वर तुतारीच्या निनादात गाडीचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण रेकला गुलाब व झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. या वेळी गाडीचा १९३० पासूनचा इतिहास दृकश्राव्य माध्यमातून उलगडण्यात आला.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन क्वीनचा ऐतिहासिक वारसा जपत प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास देता यावा, यासाठी अलीकडेच गाडीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. विशेषतः डायनिंग कारचे नव्याने डिझाइन, कोचमधील फर्निचर, छत आणि फरशीचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. तसेच स्वच्छता आणि सुविधा वाढवण्यासाठीही विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या गाडीच्या वेळेचे काटेकोर पालन आणि दर्जेदार सुविधांमुळेच आजही अनेक प्रवासी डेक्कन क्वीनलाच पसंती देत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
डेक्कन क्वीनचा गौरवशाली इतिहास
१ जून १९३० रोजी सुरू झालेली डेक्कन क्वीन ही मुंबई-पुणेदरम्यान धावणारी भारतातील पहिली डिलक्स गाडी मानली जाते. देशातील पहिली सुपरफास्ट प्रवासी गाडी, लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक इंजिन असलेली गाडी आणि व्हॅस्टिब्युल कोच असलेल्या सुरुवातीच्या गाड्यांपैकी ती एक आहे. या गाडीत महिलांसाठी स्वतंत्र डबा आणि डायनिंग कारची सुविधा देणाऱ्या पहिल्या गाड्यांमध्येही तिचा समावेश होतो. कालांतराने व्हॅक्यूम ब्रेक कोचपासून आधुनिक एलएचबी डब्यांपर्यंत या गाडीने प्रगतीचा प्रवास केला आहे.
प्रवाशांच्या प्रतिक्रिया
२०१५ पासून मी या गाडीने प्रवास करतो. वेळेचे पालन आणि सुधारलेल्या सुविधा यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे. नूतनीकरणामुळे गाडीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्यासारखे वाटते.
- संदीप चव्हाण, प्रवासी
.....
१९९२ पासून माझा मुंबई-पुणे प्रवास डेक्कन क्वीननेच होतो. या गाडीशी भावनिक नाते आहे. पूर्वी गाडी सुटताना वाजणारे संगीत पुन्हा सुरू करावे.
- सिकंदर शेख, प्रवासी
......
ग्राफिक्स
डेक्कन क्वीनमधील प्रमुख सुधारणा
• डायनिंग कारचे पारंपरिक शैलीत नूतनीकरण
• कोचमधील फर्निचर, छत व फरशीचे आधुनिकीकरण
• स्वच्छतागृहांमध्ये नवीन मॅट्स, साबण व टिश्यू डिस्पेंसर
• एसी कोचमध्ये नवीन सीट कव्हर्स
• कोचच्या आतील भागाला आकर्षक थीम
• एअर फ्रॅग्रन्स डिस्पेंसरची सुविधा
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.