मुंबईकरांसाठी वीज स्वस्त होणार
अदाणी, टाटा, बेस्टचे १ एप्रिलपासून नवे दर लागू; प्रतियुनिटमागे एक-दीड रुपयांची कपात
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : राज्यातील विजेच्या दरात कपात झालेली असतानाच आता मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. बहुवार्षिक वीजदर निश्चितीअंतर्गत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) मार्च २०२५ मध्ये दिलेल्या आदेशानुसार २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मुंबईत वीज वितरण करणाऱ्या टाटा पॉवर, अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि बेस्टची वीज स्वस्त होणार आहे. सध्याच्या वीजदराच्या तुलनेत प्रति युनिटमागे सरासरी एक-दीड रुपयांची कपात होणार असल्याने घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वीज कंपन्यांबरोबरच ग्राहकांना आपले आर्थिक गणित जुळवता, आपल्या मिळणाऱ्या विजेचा दर काय असेल, याची आगाऊ माहिती व्हावी म्हणून वीज आयोगाकडून बहुवार्षिक वीजदर निश्चितीअंतर्गत पुढील पाच वर्षांचे वीजदर जाहीर केले जातात. त्यानुसार वीज आयोगाने मार्च २०२५ मध्ये टाटा पॉवर, अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि बेस्टचे २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांकरिता वीजदर जाहीर केले होते. त्यानुसार २०२५-२६ आणि २०२६-२७ या पहिल्या दोन वर्षांत वीजदरात कपात केली होती. पुढील आर्थिक वर्षासाठीचे वीजदर १ एप्रिलपासून लागू होणार असून त्यामध्ये कपात असल्याने ग्राहकांना एप्रिल महिन्यात वापरलेल्या विजेचे मे महिन्यात येणारे बिल कमी झाल्याचे दिसणार आहे.
वीजदर असे असतील
अदाणी
वीज वापर - सध्याचा दर नवा दर
०-१०० - ६.३८ रु. - ४.९३ रु.
१०१-३०० - ९.६३ रु. - ८.१३ रु.
३०१-५०० - ११.०३ रु. - ९.३८ रु.
५०० पेक्षा जास्त - ११.९८ रु. - १०.६३ रु.
टाटा पाॅवर
वीज वापर - सध्याचा दर नवा दर
०-१०० - ४.७६ रु. - ४.३० रु.
१०१-३०० - ७.९६ रु. - ७.१० रु.
३०१-५०० - १३.५५ रु. - ११.६४ रु.
५०० पेक्षा जास्त - १४.५५ रु. - १२.६४ रु.
बेस्ट
वीज वापर - सध्याचा दर नवा दर
०-१०० - ३.८४ रु. - ३.८४ रु.
१०१-३०० - ७.४३ रु. - ७.१७ रु.
३०१-५०० - ११.९१ रु. - ११.८५ रु.
५०० पेक्षा जास्त - १४.११ रु. - १३.०७ रु.
कंपन्यांच्या महसुलावर कात्री
- अदाणी इलेक्ट्रिसिटीने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ११ हजार ४२३ कोटी रुपये एकूण महसुलाची मागणी केली होती, त्याला वीज आयोगाने कात्री लावत नऊ हजार ३६३ कोटी रुपये एवढा महसूल मंजूर केला आहे.
- बेस्टने २०२६-२७ या वर्षासाठी ४,५९२ कोटी रुपयांची मागणी केली होती; मात्र आयोगाने ४,५६१ कोटी रुपये एवढ्या महसुली वसुलीला मंजुरी दिली आहे.
- टाटा पॉवरने ५,००४ कोटी रुपयांच्या महसुलाची आवश्यकता नोंदवली होती; परंतु आयोगाने ४,५९० कोटी रुपये एवढ्या महसुलाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे वीजदरात कपात शक्य झाली आहे.
बहुवार्षिक वीजदर निश्चितीअंतर्गत वीज आयोगाने मागील वर्षीच पुढील पाच वर्षांचे वीजदर निश्चित केले आहेत. त्यानुसार १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार असून ते कमी होत असल्याने मुंबईतील वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, वर्षभरात इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीच्या फरकाची रक्कम इंधन समायोजन आकाराच्या (एफएसी) माध्यमातून ग्राहकांवर येणार असली तरी ती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बिलात लागू शकते.
- डाॅ. अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.