२९ लाख वृक्षांना मिळणार ‘संजीवनी’
मुंबई महापालिकेची एप्रिलमध्ये विशेष मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : वाढते शहरीकरण आणि सिमेंटच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईतील वृक्षांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. आगामी जागतिक वसुंधरा दिन (ता. २२) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत संपूर्ण मुंबईत ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आहेत. यापैकी सुमारे १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष रस्ते, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी आहेत. अनेक ठिकाणी झाडांच्या मुळांभोवती सिमेंट-काँक्रीट केल्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. परिणामी, झाडे कोमेजण्याचा धोका वाढतो. त्यामुळे महापालिकेच्या अभियानांतर्गत वृक्षांभोवतीचे काँक्रीट काढून त्याजागी माती टाकली जाणार आहे. तसेच झाडांच्या खोडांना लावलेले जाहिरात फलक, खिळे, दोऱ्या आणि केबल्स हटवून झाडांना इजा होण्यापासून वाचवले जाणार आहे. २०२५ मध्ये राबविलेल्या मोहिमेत महापालिकेला मोठे यश आले. त्या वेळेस ३४० वृक्षांभोवतीचे काँक्रीट काढण्यात आले. १,४६० झाडांवरील जाहिरात फलक हटविले तर झाडांच्या खोडांतून तब्बल १७.४३ किलो खिळे काढण्यात आले.
जनजागृतीवर भर
वृक्षांच्या खोडाला खिळे ठोकल्यामुळे किंवा वायर गुंडाळल्यामुळे ही झाडे कमकुवत होऊन कोसळण्याची शक्यता असते. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष जतन व संवर्धन अधिनियम, १९७५ अंतर्गत अशा प्रकारची जनजागृती करणे, हे महापालिकेचे कर्तव्य आहे. या मोहिमेत झाडांच्या खोडांना गेरू-चुना लावून त्यांचे संरक्षण करणे आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी करणे, असे उपक्रम राबवले जातील.
उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर
‘महापालिकेच्या या अभियानात केवळ पालिका कर्मचारीच नव्हे, तर शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून ही मोहीम राबविली जाईल,’ अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.