भारत-मध्य पूर्व सागरी संपर्काला चालना
‘जेएनपीए’वर ‘जेजेएस’ शिपिंग सेवेची सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) आपल्या पीएसए मुंबई कंटेनर टर्मिनलवर ग्लोबल फीडर शिपिंगच्या ‘जेजेएस’ सेवेची सुरुवात केली आहे. २४ मार्चला एमव्ही एसएसएफ डायनॅमिक या जहाजाच्या आगमनाने या सेवेची सुरुवात झाली.
नव्या सेवेमुळे मुंद्रा, न्हावा शेवा, जेद्दाह, किंग अब्दुल्ला, सोखना आणि अकाबा या महत्त्वाच्या बंदरांदरम्यान नियमित सागरी सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भारत आणि मध्य पूर्वेतील व्यापार संपर्क अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या सेवेचा फायदा भारतीय निर्यातदार आणि आयातदारांना होणार असून, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत मालवाहतुकीसाठी अधिक विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होणार आहेत. यामुळे पुरवठा साखळी अधिक सक्षम आणि लवचिक होण्यास मदत होईल, असा विश्वास बंदर प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, याच महिन्याच्या सुरुवातीला पीएसए मुंबई टर्मिनलवर जर्मन ध्वजाखालील ‘दमिएटा एक्स्प्रेस’ या अल्ट्रा लार्ज कंटेनर व्हेसलचेही स्वागत करण्यात आले. सुमारे २३ हजार ६६४ ‘टीईयू’ क्षमता, जवळपास ४०० मीटर लांबी आणि ६१ मीटर रुंदी असलेले हे जहाज जेएनपीए बंदरावर दाखल झालेले आतापर्यंतचे सर्वात मोठे कंटेनर जहाज ठरले. जागतिक दर्जाच्या टर्मिनल ऑपरेटर्सच्या सहकार्यामुळे बंदराची कार्यक्षमता वाढत असून, भविष्यातही अशा सेवांमुळे जेएनपीएची आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धात्मकता अधिक मजबूत होईल, असेही प्राधिकरणाने सांगितले.
जेजेएस सेवा म्हणजे का?
‘जेजेएस’ ही ग्लोबल फीडर शिपिंग कंपनीची कंटेनर वाहतूक सेवा असून, विविध देशांतील प्रमुख बंदरांना जोडणारी नियमित सागरी सेवा आहे. या सेवेद्वारे कंटेनर जहाजे ठरावीक मार्गावर नियोजित वेळापत्रकानुसार मार्गक्रमण करतात. या सेवेचा मुख्य उद्देश म्हणजे निर्यात आणि आयात मालाची जलद व सुरक्षित वाहतूक करणे तसेच मोठ्या आंतरराष्ट्रीय बंदरांशी कनेक्टिव्हिटी वाढवणे हा आहे. विशेषतः भारत आणि मध्य पूर्वेतील बंदरांदरम्यान मालवाहतूक सुलभ करण्यासाठी ही सेवा महत्त्वाची मानली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.