रेल्वे अपघात टाळण्यास
देशभरात सब-वे उभारा!
१२ तासांत बांधता येईल; रेल्वेमंत्र्यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने आता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशभरात ज्या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे रेल्वे रूळ ओलांडतात, अशा संवेदनशील ठिकाणी सब-वे (भुयारी मार्ग) उभारण्याचे निर्देश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत.
नवी दिल्ली येथे रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या कार्यशाळेत या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देताना, अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर रेल्वेमंत्र्यांनी भर दिला. रेल्वे रुळाच्या एका बाजूला वस्ती आणि दुसऱ्या बाजूला शाळा, शेती, स्मशानभूमी किंवा अन्य महत्त्वाची ठिकाणे आहेत, अशा ठिकाणी या सब-वेची उभारणी केली जाणार आहे. विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सब-वे अवघ्या १२ तासांत उभारता येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितरीत्या रूळ ओलांडता येईल.
---
सायकल, दुचाकी नेण्याची सुविधा
प्रस्तावित सब-वे केवळ पादचाऱ्यांसाठीच नव्हे तर सायकल आणि दुचाकींसाठीही उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे नागरिकांना रोजच्या कामासाठी आवश्यक वस्तू सुरक्षितपणे एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला नेता येणार आहेत. या सुविधेमुळे अनधिकृतपणे रूळ ओलांडण्याचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे.
----
पाच-सहा वर्षांत समस्या सोडवा
देशभरातील रेल्वे रूळ ओलांडण्याच्या समस्येवर पुढील पाच ते सहा वर्षांत प्रभावी तोडगा काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यात पाणी साचणार नाही, यासाठी योग्य जलनिस्सारण व्यवस्थाही करण्यात येणार आहे.