पाच वर्षांत ५२ हजार अटकेत
रेल्वे प्रशासनाची गुन्हेगारांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वेने गुन्हेगारांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. मागील पाच वर्षांत ५२ हजार ४९४ जणांना अटक केली, तर ५० हजार ४३२ आरोपींविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. दगडफेक, रेल्वे मालमत्ता चोरी आणि तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०२१ ते २०२५ या कालावधीत रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे मालमत्ता (अनधिकृत ताबा) कायदा १९६६ अंतर्गत धडक कारवाई केली. चोरी, अपहार, संगनमत आणि कटकारस्थान यांसारख्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात संबंधित न्यायालयांत खटले दाखल करण्यात आले. रेल्वेगाड्यांवरील दगडफेक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत १२ हजार १५७ दगडफेक प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यात आठ हजार ४४१ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अशा घटनांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
----
केवळ तीन अपघात
रेल्वे रुळांशी छेडछाड करून अपघात घडवण्याच्या घटना अत्यल्प असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. मागील पाच वर्षांत अशा केवळ तीन घटना घडल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
---
सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाची मदत
रेल्वे मार्गांवरील गुन्हे रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर वाढविण्यात आला आहे. ड्रोनद्वारे निगराणी, सौरऊर्जेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे, संवेदनशील भागांमध्ये वाढीव गस्त तसेच राज्य पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांशी समन्वय अशा उपाययोजना करण्यात येत आहेत.
---