पालिकेच्या इमारती थंड ठेवण्यासाठी नवा उपाय
सौर परावर्तक रंगामुळे ऊर्जा बचत, उष्णतेत घट अपेक्षित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबईत सातत्याने वाढणारा उन्हाचा कडाका कमी करण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील पालिकेच्या इमारतींचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सौर परावर्तक रंग म्हणजेच म्हणजेच कूल रूफ पेंट लावण्याचा पथदर्शी प्रकल्प महापालिका राबवणार आहे. या उन्हाळ्यात वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळचा समावेश असलेल्या जी-दक्षिण विभागात हा प्रयोग सर्वप्रथम राबवला जाणार आहे.
हा एक विशेष प्रकारचा पांढऱ्या रंगाचा थर असतो, जो इमारतीच्या छतावर लावला जातो. यामध्ये ‘टायटॅनियम डायऑक्साइड’सारख्या घटकांचा वापर केलेला असतो. हा थर सूर्याची अतिनील किरणे शोषून घेण्याऐवजी ती परावर्तित करतो. त्यामुळे इमारतीच्या छताचा पृष्ठभाग थंड राहतो आणि पर्यायाने आतील तापमानात सुमारे पाच टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.
महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जी-दक्षिण विभाग कार्यालयाने यापूर्वीच नेट झीरो आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे या विभागाची निवड करण्यात आली आहे. प्राथमिक टप्प्यात पालिकेच्या शाळा आणि कर्मचारी वसाहती यांसारख्या इमारतींवर हा प्रयोग केला जाईल, जिथे मुले आणि नागरिक अधिक संख्येने असतात.
या नवीन प्रयोगामुळे घरातील अंतर्गत तापमान पाच टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. सूर्याची किरणे शोषण्याऐवजी ती परत फिरवून उष्णता रोखली जाणार. मे महिन्यापर्यंत हा पथदर्शी प्रकल्प राबवण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण मुंबईतील पालिका इमारतींवर हा उपक्रम राबवला जाईल.
२०२५ मधील अहवालात शिफारशी
अहमदाबाद आणि तेलंगणसारख्या राज्यांमध्ये ‘कूल रूफ पॉलिसी’ आधीपासूनच यशस्वी झाली आहे. मुंबई महापालिकेने ‘सी ४० सिटीज’ च्या सहकार्याने २०२५ मध्ये तयार केलेल्या अहवालातील शिफारशींनुसार हा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानामुळे केवळ वीज बचतीलाच मदत होणार नाही, तर मुंबईतील वाढत्या उष्णतेवरही प्रभावी मात करता येईल, असा विश्वास पर्यावरण विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.