निर्देशांक दीड टक्के उसळले
सेन्सेक्स ११८६ अंश वाढला
मुंबई, ता. १ : अमेरिका इराण युद्ध संपण्याबाबत अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी सकारात्मक विधान केल्यामुळे आज जगातील सर्वच शेअर बाजारांप्रमाणे भारतीय शेअर बाजारांनीही दीड टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दाखवली. सेन्सेक्स ११८६.७७ अंश, तर निफ्टी ३४८ अंश वाढला.
सकाळी शेअर बाजारांची सुरुवात जोरदार झाली. कालच्या बंद भावापेक्षा सेन्सेक्स १,७०० अंश नफा दाखवीत उघडला. थोड्याच वेळात तो ७४ हजारांच्या आसपास गेला होता; मात्र तेथून हळूहळू नफावसुली झाली आणि दिवसअखेर सेन्सेक्स ७३,१२४.३२ अंशावर, तर निफ्टी २२,६७९.४० अंशांवर स्थिरावला.
आजच्या तेजीमुळे शेअर बाजारातील सर्व गुंतवणूकदारांच्या एकूण सर्व मालमत्तेचे मूल्य १० लाख कोटी रुपयांनी वाढले. काल ते ४१२ लाख कोटी रुपये होते, तर आज ते ४२२ लाख कोटी रुपये झाले. गेल्या दोन दिवसांचा तोटा आज संपुष्टात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आज ३,६७५ शेअरचे भाव वाढले, ४७८ शेअरचे भाव कमी झाले, तर ९० शेअरचे भाव कालच्या एवढेच राहिले. आज रुपया स्थिर राहिला आणि कच्च्या तेलाचे भावही कमी झाले. यामुळेही बाजारात आनंदाचे वातावरण होते.
आज १६ पैकी १५ क्षेत्रे नफ्यात होती. केवळ औषधनिर्मिती क्षेत्र एक टक्का तोटा दाखवत होते. संरक्षण क्षेत्र पाच टक्के वाढले, तर कॅपिटल गुड्स, प्रसारमाध्यमे, सरकारी बँका हे निर्देशांक तीन टक्के वाढले. वाहननिर्मिती, आयटी, धातूनिर्मिती, बांधकाम व्यवसाय, एफएमसीजी, दूरसंचार, खाजगी बँका हे निर्देशांक एक ते दोन टक्के वाढले. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, डेल्हिवरी हे वाहतूक साठवणूक क्षेत्राचे शेअर वाढले. तसेच गार्डनरिच, बीईएल हे संरक्षण विषयक शेअरही वाढले.
आज सेन्सेक्समध्ये ट्रेंटचा शेअर सर्वात जास्त म्हणजे सात टक्के वाढला. इंडिगो, अदाणी पोर्ट यांचे शेअरही सहा टक्क्यांच्या आसपास वाढले. बीईएल साडेचार टक्के, तर स्टेट बँक चार टक्के वाढला. एटरनल, लार्सन अँड टुब्रो, टायटन, एशियन पेंट, ॲक्सिस बँक, महिंद्र आणि महिंद्र, इन्फोसिस, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, टाटा स्टील, टीसीएस या शेअरचे भावही वाढले.
कोट
.......
आता बचावात्मक सुरक्षित शेअर करून जास्त नफा देणाऱ्या शेअरवर सर्वांचा भर आहे. तरी परिस्थिती पालटेल का, यावर सर्व जण लक्ष ठेवून आहेत.
-विनोद नायर, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.