एसआयआरच्या कामामुळे शिक्षकांच्या सुट्ट्यांवर पाणी?
गावी जाणाऱ्यांपुढे पेच
मुंबई, ता. १ ः मुंबई आणि परिसरातील शिक्षकांवर महसूल विभागाने मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण मोहीम (एसआयआर) आणि त्यासोबतच जनगणनेच्या कामाची जबाबदारी टाकल्याने लवकरच सुरू होणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांवर पाणी फेरले जाण्याची भीती शिक्षकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
राज्यात सुरू होत असलेल्या एसआयआर मोहिमेसाठी शिक्षकांना विविध ठिकाणी सहभागी होण्यासाठी आदेश जारी केले आहेत. यासाठी हजर न होणाऱ्या शिक्षकांवर कारवाईदेखील केली जाणार असल्याने शिक्षक संघटनांमध्ये याविषयी तीव्र नाराजी आहे. दुसरीकडे जनगणना आदींचा अपवाद सोडून निवडणुकीसह इतर कामकाजामध्ये शिक्षकांना जुंपले जाणार नाही, यासाठीचे ठोस आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून विधानमंडळ सभागृहात दिलेले असताना शिक्षकांना महसूल विभागाकडून आदेश का दिले जातात, असा सवाल शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी उपस्थित केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आदी जिल्ह्यातील शिक्षकांना उन्हाळी परीक्षा संपल्याबरोबर एसआयआरच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश मिळाले असल्याने या उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान मुंबईतून आपल्या गावी जाणाऱ्या तसेच मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या शिक्षकांची मोठी अडचण होणार आहे.
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून हिंदी, उर्दू आणि इतर माध्यमातून शिक्षकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष सवलत दिली जाते. यासोबतच त्यांच्या प्रवासासाठी दरवर्षी विशेष रेल्वेदेखील सोडली जाते; मात्र आता सुट्ट्यांचे काय होणार, असा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.