मुंबईत गोपालक समाज संकटात
मंदिर परिसरातील गायींवर होणाऱ्या कारवाईने उपासमारीची वेळ
मुंबई, ता. २ : शहरातील मोठ्या मंदिरांच्या परिसरात गायी बांधून भक्तांना दर्शनाची सेवा देणाऱ्या भटक्या गोपालक समाजावर महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईमुळे या समाजासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. गायींची सेवा आणि त्यावरच अवलंबून असलेला उदरनिर्वाह धोक्यात आल्याची व्यथा त्यांनी व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात नुकतीच विशेष बैठक घेऊन गोपालक समाजाच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीत अखिल भारतीय भटक्या व विमुक्त जाती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, गोसावी समाज प्राचीन काळापासून गोसेवक म्हणून ओळखला जात असून गायींची पूजा आणि भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे महापालिका आणि पोलिस प्रशासन मंदिर परिसरात गायी उभ्या करण्यास मज्जाव करत असल्याची तक्रार त्यांनी केली. गायींना कोंडवाड्यात टाकले जाते, तर त्यांची देखभाल करणाऱ्या महिलांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे कारण देत महिलांना गुन्हेगार ठरवले जाते, असे भोसले यांनी नमूद केले. यावेळी गोसेविका नेत्या कल्पना चव्हाण, नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे ज्येष्ठ नेते कृष्णा शिंदे, तसेच तानाजी शेगर आदींनीही प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला. त्यांनी या वंचित घटकाचा रोजगार हिरावला जात असल्याचा आरोप केला.
बैठकीदरम्यान शेखर मुंदडा यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले. मंदिर परिसरातील गायींच्या प्रश्नाला प्राधान्य देत कायद्याच्या चौकटीत राहून गोसेविका महिला आणि गायींना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी गोपालक समाजाकडून होत असून, प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.