मुंबईच्या सुरक्षेसाठी महापालिका सज्ज
शहरातील सीसीटीव्ही जाळे होणार अद्ययावत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत आणि आधुनिक करण्यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. पालिकेचे मुख्यालय तसेच मुंबईतील इतर वर्दळीच्या आणि संवेदनशील ठिकाणांवरील सर्व्हिलन्स सिस्टीम (पाळत ठेवण्याच्या यंत्रणेचे) अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, यासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुंबईत सध्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने महापालिकेच्या मुख्यालयासह विविध महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवले जाते; मात्र तंत्रज्ञानातील वेगाने होणारे बदल आणि सुरक्षेची वाढती गरज लक्षात घेता जुन्या यंत्रणेत सुधारणा करणे आवश्यक झाले होते. नवीन प्रकल्पानुसार, आता अधिक स्पष्ट रिझोल्यूशन असलेले कॅमेरे, प्रगत व्हिडिओ ॲनालिटिक्स आणि जलद प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. महापालिका मुख्यालय इमारत आणि मुंबईतील इतर महत्त्वाच्या पालिकेच्या वास्तू व सार्वजनिक ठिकाणे येथील सीसीटीव्हीचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. नवीन यंत्रणेमध्ये फेस रेकग्निशन (चेहरा ओळखणे) आणि मोशन डिटेक्शन यांसारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश असण्याची शक्यता आहे. यामध्ये सीसीटीव्हीचे फुटेज हाताळण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचेही आधुनिकीकरण केले जाणार आहे. या कामासाठी पात्र कंपन्यांना २२ एप्रिलपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
डिजिटल सुरक्षा यंत्रणेत सुधारणा
महापालिकेच्या या निर्णयामुळे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे प्रशासनाला सोपे होणार आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ही अद्ययावत यंत्रणा पोलिसांना आणि महापालिका प्रशासनाला अत्यंत उपयुक्त ठरेल. महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईच्या डिजिटल सुरक्षा यंत्रणेत मोठी सुधारणा होणार असून, एप्रिलअखेर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.