उष्माघाताचा फटका आता प्राणी-पक्ष्यांनाही
परळ पशुवैद्यकीय रुग्णालयात वाढती गर्दी; निर्जलीकरणामुळे शेकडो जीव उपचाराधीन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महानगरातील वाढत्या उष्णतेचा परिणाम आता फक्त माणसांपुरता मर्यादित न राहता मुक्या प्राण्यांवर आणि पक्ष्यांवरही गंभीरपणे होत आहे. परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील गेल्या महिन्याचे आकडे या परिस्थितीची तीव्रता स्पष्ट करतात. मोठ्या संख्येने पक्षी आणि प्राणी उष्माघात व निर्जलीकरणामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत.
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात ३५ घार, ३३ कबुतरे, १५ कावळे, दोन पोपट आणि दोन घार यांना तीव्र उष्णतेमुळे दाखल करावे लागले. हे सर्व पक्षी निर्जलीकरण, उघड्या तोंडाने श्वास घेणे आणि अत्याधिक धाप लागणे अशा लक्षणांसह आणले गेले.
पाळीव आणि भटके प्राणीही या संकटातून सुटलेले नाहीत. मागील महिन्यात २० ते २२ कुत्रे आणि १२ मांजरी उष्माघातामुळे दाखल झाले. सध्या रुग्णालयात १५७ कुत्रे आणि ७७ मांजरी उपचार घेत आहेत. सर्व वॉर्ड पूर्णपणे भरलेले आहेत.
रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. मयूर डंगर यांनी सांगितले की, हीट स्ट्रोकच्या प्रकरणांमध्ये प्राण्यांचे शरीराचे तापमान सामान्यांपेक्षा खूप वाढते. कुत्र्यांमध्ये शरीराचे तापमान १०२ ते १०४ डिग्रीपर्यंत पोहोचते. ते वेगाने श्वास घेतात, डोळे लाल होतात आणि तोंडातून जास्त लाळ गळते, असे त्यांनी सांगितले.
हवामानातील बदल आणि तापमानातील सततची वाढ याचा थेट परिणाम प्राणी-पक्ष्यांच्या आरोग्यावर होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः शहरांमध्ये पाण्याची कमतरता, सावलीचा अभाव आणि काँक्रीटीकरण यामुळे भटक्या प्राण्यांची परिस्थिती अधिक बिकट होत आहे.
असे केले जातात उपचार
उपचाराबाबत रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. मयूर डंगर यांनी सांगितले की, प्रथम प्राण्यांचे शरीर थंड केले जाते. ओल्या कापडाने शरीर झाकले जाते, ज्यामुळे तापमान कमी होते. त्यानंतर सलाइन आणि बहुविटामिन गोळ्या देऊन शरीराला पुन्हा जलयुक्त केले जाते.
हृदय, यकृतावर परिणाम
तज्ज्ञांच्या मते, वेळेवर उपचार न मिळाल्यास उष्माघात जीवघेणा ठरू शकतो. वाढत्या तापमानाचा परिणाम हृदय, यकृत आणि मूत्रपिंडांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर होतो, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.