देशभर फसवणुकीचे गुन्हे करणारा भामटा अटकेत
आठवी पास आरोपीचे आर्थिक साम्राज्य पाहून पोलिस थक्क; कफ परेड पोलिसांची जमातारा तेथे कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः देशभर सायबर फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या प्रमुख आरोपीस कफ परेड पोलिसांनी झारखंडच्या जामतारा जिल्ह्यातून अटक केली. विशेष म्हणजे, फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या २५ वर्षांच्या आरोपीने सायबर फसवणुकीतून आलिशान बंगला, व्यावसायिक गाळे, हार्डवेअरसारखा व्यवसाय, महागड्या गाड्या असे आर्थिक साम्राज्य उभे केल्याची माहिती तपासातून पुढे आली.
मझहर आलम इसराईल मिया (२५) असे या आरोपीचे नाव आहे. काही वर्षांपर्यंत तो सायबर भामट्यांच्या संघटित टोळीचा एक भाग होता. एका प्रकरणात त्याला अटक झाली. कारागृहातून बाहेर पडल्यावर त्याने स्वतःची संघटित टोळी उभारून स्वतंत्रपणे फसवणुकीचे सत्र आरंभले. गेल्या वर्षभरात त्याच्याविरोधात १० राज्यांत ३६ फसवणुकीच्या तक्रारी नोंद झाल्या.
अशी करत असे फसवणूक
गुगलवरील एडिट अँड सजेस्ट या सुविधेचा वापर करून निरनिराळ्या बँकांच्या क्रेडिट कार्ड हेल्पलाइन, ग्राहक सेवा केंद्रांच्या तपशिलात मजहर स्वतःचे मोबाईल क्रमांक देत असे. याशिवाय विविध बँकेचे बनावट वेब पेज तयार करून त्यात स्वतःचे मोबाईल क्रमांक देत असे. त्यावर ग्राहकाने संपर्क साधल्यास क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवत असे. बोलण्यात गुंतवून, एपिके फाइलद्वारे ग्राहकाच्या मोबाईल फोनचे नियंत्रण स्वतःकडे घेत असे. क्रेडिट कार्डच्या गोपनीय माहितीचा उपयोग करून परस्पर वळते करत असे.
असा झाला तपास
कफ परेड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचे सहा लाख रुपये अशाच प्रकारे परस्पर, अनोळखी खात्यांवर वळते झाले होते. तक्रार प्राप्त होताच वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमित देवकर, उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत आणि पथकाने तक्रारदाराला एपिके फाइल पाठवण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल (आयएमइआय) आणि सिम कार्ड क्रमांकाआधारे तांत्रिक तपास सुरू केला. महिनाभरात तीन मोबाईल फोनमध्ये संशयित आरोपीने तब्बल ९४ सिम कार्ड वापरून देशभर फसवणुकीचे सत्र आरंभल्याची माहिती पुढे आली. त्या माहितीआधारे पोलिस पथक जामतारा येथे धडकले. पथकाने अलीफा हार्डवेअर दुकानाजवळून मजहरला ताब्यात घेतले. मोबाईल तपासणीतून भक्कम पुरावे समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.