मुंबई महापालिकेचा २०२६-२७चा अर्थसंकल्प मंजूर
स्थायी समितीला ८०० कोटींचा ‘बंपर’ निधी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : महापालिकेच्या २०२६-२७ या आगामी आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाला सोमवारी स्थायी समितीने अधिकृत मंजुरी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीसाठी ८०० कोटी रुपयांच्या विकास निधीची तरतूद करण्यात आली आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर या अर्थसंकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव ९ एप्रिलला महापालिका सभागृहात मांडला जाणार आहे.
महापालिकेच्या नियमानुसार, दरवर्षी अर्थसंकल्पाच्या मंजुरीपूर्वी स्थायी समितीला विकास निधी दिला जातो. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा हा निधी ५००-६०० कोटींवरून थेट ८०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात येणार आहे.
८०० कोटींपैकी २३७ कोटी नगरसेवकांसाठी, तर उर्वरित ५६३ कोटींच्या वाटपावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उर्वरित निधीपैकी सुमारे १०० ते १५० कोटी रुपये महापौरांच्या अखत्यारीत राहण्याची शक्यता आहे. ३१३ कोटींचा उर्वरित निधी स्थायी समितीकडे राहणार आहे. हा निधी नगरसेवकांच्या प्रस्तावांवरून दिला जाईल, असे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
२०१७ ते २०२२ या काळात महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आणि सध्याच्या सत्ताधारी भाजप यांच्यातील जुना संघर्ष या निधीवाटपात उमटण्याची चिन्हे आहेत.
-----
विराेधी नगरसेवकांना निधी किती?
सूत्रांच्या माहितीनुसार, ३१३ कोटी रुपयांच्या राखीव निधीतून ठाकरे गट, काँग्रेस, एमआयएम आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांना केवळ ७० ते ८० कोटी रुपयांचा मर्यादित वाटा मिळण्याची शक्यता आहे. महापौरांच्या निधीतूनही विरोधकांना कमी वाटा मिळण्याची शक्यता असल्याने ९ एप्रिलच्या सभागृहाच्या बैठकीत हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.