लोकल अधिक सक्षम होणार
रेल्वेची २३८ नव्या रेकची खरेदी प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबई उपनगरी रेल्वेची वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेऊन १२ डब्यांच्या २३८ नव्या लोकल गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी)-३ आणि ३ अ अंतर्गत सुमारे १९,२९३ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर दररोज एकूण ३,२३४ लोकल फेऱ्या चालतात. त्यात पश्चिम रेल्वेच्या १,४१४ फेऱ्यांपैकी १३३ एसी लोकल आहेत, तर मध्य रेल्वेच्या १,८२० फेऱ्यांमध्ये ९४ एसी लोकलचा समावेश आहे. या सेवांमुळे मुंबई, ठाणे, कल्याण, विरार आणि पनवेल परिसरातील लाखो प्रवाशांची वाहतूक केली जाते. वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल गाड्या चालवता याव्यात यासाठी ३४ स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्ताराची कामे सुरू असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच स्थानकांची हाताळणी क्षमता वाढवण्यासाठी विविध पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत.
मुंबई उपनगरी रेल्वेच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी एमयूटीपी-२ (८,०८७ कोटी), एमयूटीपी-३ (१०,९४७ कोटी) आणि एमयूटीपी-३ अ (३३,६९० कोटी) असे महत्त्वाचे प्रकल्प मंजूर करण्यात आल्याची माहितीही रेल्वे मंत्रालयाने दिली.
प्रवासी वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन रेल्वेकडून प्रवासी मागणीचे नियमित विश्लेषण केले जाते. त्यानुसार नवीन गाड्या सुरू करणे, विद्यमान गाड्यांचे डबे वाढवणे तसेच फेऱ्यांची संख्या वाढवणे अशा उपाययोजना केल्या जात असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले.
लवकरच आणखी सहा लोकल सेवेत
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०२५-२६ या वर्षात मुंबई उपनगरी सेवेत १२ डब्यांच्या चार एसी लोकल (मध्य आणि पश्चिम रेल्वेला प्रत्येकी दोन) दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच पश्चिम रेल्वेत १५ डब्यांची एक सामान्य लोकल सुरू करण्यात आली आहे. याशिवाय चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या दोन बिगर एसी लोकलची निर्मिती सुरू असून, या गाड्या लवकरच मुंबईच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.