परप्रांतीयांवर मुंबईची छत्रछाया
खाडी तणावात स्थलांतराचा अंदाज फोल, मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांत दीड टक्के वाढ
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : इराण-अमेरिका-इस्त्राईल तणावामुळे खाडी भागात निर्माण झालेल्या अस्थिरतेचे पडसाद जगभर उमटले. अशा काळात गॅसटंचाईमुळे मुंबईतील हॉटेल व्यवसायात असलेले हजारो परप्रांतीय कामगार गावाकडे परततील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मेल-एक्स्प्रेसच्या गाड्यांच्या प्रवाशांची संख्या दीड टक्क्यांनी वाढल्याने परप्रांतीयांवर मुंबईची छत्रछाया कायम असल्याचे दिसत आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार मार्च २०२६ मध्ये ३४.४७ लाखांहून अधिक प्रवाशांनी मेल-एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास केला. मागील वर्षाच्या तुलनेत वाढ जरी किरकोळ असली तरी संभाव्य आर्थिक परिणामांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः परप्रांतीय कामगारांची ये-जा सुरूच असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
---------------------
प्रवाशांची संख्या स्थिर
मुंबईचा हॉटेल, खाणावळ व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांवर उभा आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमधील हजारो तरुण स्वयंपाकी, वेटर, हेल्पर, भांडी धुणारे कर्मचारी, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. मुंबईतील लहान हॉटेलपासून मोठ्या रेस्टॉरंटपर्यंतचा कारभार ठप्प होऊ शकतो, पण मेल-एक्स्प्रेस प्रवाशांची संख्या स्थिर राहिल्याने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
-----------------------
रेल्वेच्या उत्पन्नात भर
प्रवासी महसुलातही जवळपास आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. तिकीट तपासणी मोहिमा, विनातिकीट प्रवाशांवर कारवाई तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासातील वाढीमुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही मुंबईत येणाऱ्यांची संख्या कायम आहे.
----------------------
भीतीपेक्षा वास्तव वेगळे
वर्ष प्रवासीसंख्या
मार्च २०२६ - ३४.४७ लाख
मार्च २०२५ - ३४ लाख
प्रवासी वाढ - १.५ टक्के
.......
रेल्वेच्या तिजोरीत वाढ
मार्च २०२६ मध्ये सुमारे ३२८ कोटी रुपये महसूल मिळाला, तर मार्च २०२५ मध्ये ३०४ कोटी रुपये होता. त्यामुळे महसुलात जवळपास आठ टक्क्यांची वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.