दादरमध्ये पत्नीच्या डोळ्यांदेखत पतीची हत्या
मुंबई, ता. १३ ः पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची सुमारे १० जणांच्या जमावाने भररस्त्यात, त्याच्या पत्नीसमक्ष हत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दादरच्या नागोसयाची वाडी येथे घडली. मृत तरुणाचे नाव अंकुश आंबोकर (४०) असून, त्याच्यावर हल्ला करणाऱ्या १० जणांविरोधात दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यातील पाच ते सहा जणांना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंकुश आणि त्याच्या हत्येतील प्रमुख आरोपी गौरव सणस पूर्वी सोबत बेंजोचा व्यवसाय करत. २०१७ मध्ये व्यावसायिक वादामुळे दोघे विभक्त झाले. दोघे स्वतंत्र व्यवसाय करू लागले. अंकुश यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यावर गौरव अंकुशला सतत टोमणे मारत, धमकावत असे. अनेकदा त्याने अंकुशला मारहाणही केली होती. त्या त्या प्रसंगानंतर दादर पोलिस ठाण्यात गैरवविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत. रविवारी अंकुश आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी वरळीच्या सेंच्युरी बाजार परिसरात जाण्यासाठी निघाला होता. तेव्हा रस्त्यात अडवून गौरव आणि त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांनी अंकुशला मारहाण सुरू केली. सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या पत्नीला या घटनेची माहिती मिळताच ती तडक मंदिरातून घटनास्थळी पोहोचली. तेव्हा तिने गौरव आणि त्याच्या साथीदारांकडून सुरू असलेली मारहाण डोळ्यांनी पाहिली. तिने आणि घटनास्थळी जमलेल्या गर्दीने अंकुशला या टोळक्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी गौरव याने सर्वांना धमकावले. मारहाण करून आरोपींचे टोळके तेथून निघून गेल्यावर अंकुशला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असे दादर पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.